चुलीवरच्या स्वयंपाकाचा हरवत चाललाय गोडवा
By Admin | Updated: October 26, 2015 02:24 IST2015-10-26T02:24:05+5:302015-10-26T02:24:05+5:30
शहराप्रमाणे ग्रामीण भागाचे चित्रसुद्धा या काही वर्षात झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे गावामध्येही स्वयंपाकघरात गॅसचा शिरकाव होऊन चुलीवरचा गोडवा हरवत चालला आहे.

चुलीवरच्या स्वयंपाकाचा हरवत चाललाय गोडवा
नेर : शहराप्रमाणे ग्रामीण भागाचे चित्रसुद्धा या काही वर्षात झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे गावामध्येही स्वयंपाकघरात गॅसचा शिरकाव होऊन चुलीवरचा गोडवा हरवत चालला आहे. स्वयंपाक घरातील चुलीची जागा आता गॅस सिलिंडरने घेतली आहे. पूर्वी ग्रामीण भागात गोधन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे घरोघरी गोवऱ्या थापल्या जायच्या. पावसाळा गोवऱ्याच्या भरवशावर जायचा. जंगलातून सरपण आणण्याचीही तेवढी गरज नव्हती. आता मात्र गावातही गोवऱ्यापासून स्वयंपाक करणे कमी झाले असून केवळ पाणगे करण्यापुरत्याच गोवऱ्या वापरल्या जातात. शिवाय तुराट्या, पऱ्हाट्या, फणकट शेतातच स्वाहा केल्या जातात.
पूर्वी याची सरपण म्हणून खेडोपाडी ओझे-ओझे जमा करून गंजी लावली जायची. आता त्या गंज्या अल्प आहेत. पूर्वी झाडे तोडण्याची गरज पडत नव्हती. चुलीवरचा स्वयंपाक हा मंद आणि हळू शिजत असतो. त्यामुळे त्यात अन्न कच्चे राहण्याची शक्यताही नसते. अर्धा स्वयंपाक तर निखाऱ्यावरच होऊन जात असे. मात्र चित्र पलटले असून केवळ हौसेपुरत्या घरी चुली राहिल्या आहेत. भाकर खावी तर चुलीवरची, अशी म्हण आजही सर्वत्र प्रचलित आहे. परंतु आता गॅसवरच भाकर केली जात असल्याने ती तेवढी कडक होत नाही. परिणामी त्याचाही गोडवा हरवत चालला आहे. लग्नसमारंभात केवळ भातकुलीचा खेळ मांडण्यापुरतीच चूल बांधली जात असून त्या पद्धतीचाही विसर पडण्याच्या मार्गावर आहे. बदलत्या काळानुरूप शहरी भागाचे लोण आता ग्रामीण भागातही पडत असल्याचे दिसत आहे.
(तालुका प्रतिनिधी)