मुख्यमंत्री साहेब, कळंबचा पाणीप्रश्न निकाली काढा!
By Admin | Updated: December 29, 2016 00:25 IST2016-12-29T00:25:14+5:302016-12-29T00:25:14+5:30
शहराला गेली अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सद्यस्थितीतील नळयोजना कुचकामी ठरली आहे.

मुख्यमंत्री साहेब, कळंबचा पाणीप्रश्न निकाली काढा!
गजानन अक्कलवार कळंब
शहराला गेली अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सद्यस्थितीतील नळयोजना कुचकामी ठरली आहे. नव्याने नगरपंचायत झालेल्या कळंब शहराची तहान भागविण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे. गुरुवार, २९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री यादृष्टीने येथे काही घोषणा करतील, अशी आशाही त्यांना आहे.
राळेगाव मतदारसंघात आजच्या स्थितीत एकही उद्योग कार्यान्वित नाही. शेतमालावर आधारित प्रकल्प नाही. सिंचनाची पर्याप्त सोय नाही. बेंबळाचे पाणी सिंचनासाठी बरोबर मिळत नाही. शेतातील विजेचा प्रश्न पाचवीला पुजलेला आहे. एमआयडीसी ओस पडलेली आहे. तेथे उद्योग उभारण्यासाठी कोणी प्रयत्न केलेला नाही. बेंबळाची कामे निकृष्ट करून ठेकेदार, अधिकारी व लोकप्रतिनिधी गब्बर झाले. याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
कळंब ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. परंतु सुविधांच्या नावाने बोंबाबोंब आहे. अनेक वर्षांपासून क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झालेले नाही. बेंबळा प्रकल्पाची अनेक कामे अपूर्ण आहेत. गावांतर्गत रस्ते बांधून प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्याची आवश्यकता आहे. ढिसाळ आरोग्य यंत्रणेला ‘रोगमुक्त’ करणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सुविधांचा अभाव आहे. बेरोजगारांना रोजगार, गाव तेथे बसची व्यवस्था, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना या विषयावर गांभीर्याने काम होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात जनतेच्या अपेक्षेस पात्र कामगिरी आमदार डॉ. अशोक उईके यांनी बजावल्यास त्यांच्या राजकीय भविष्याचा आलेख चढता राहणार आहे. परंतु यासाठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ताकद’ द्यावी, अशीही जनतेची मागणी आहे.
वीस वर्षांपासून राळेगाव मतदारसंघाचा अपेक्षित व गतिमान विकास झालेला नाही. येणाऱ्या काळात विकासाची गती वाढावी, यासाठी मतदारांनी परिवर्तन घडविले. आता आमदार डॉ.अशोक उईके विकासाचे आव्हान घेऊन उभे ठाकले आहे. त्यांच्या प्रयत्नाला मुख्यमंत्र्यांचीही साथ हवी आहे.
आमदारांना हवी आता ‘सीएम’ची साथ
कळंबच्या इतिहासात शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री बहुदा पहिल्यांदाच येत आहे. यात आमदार डॉ.अशोक उईके यांचा पुढाकार आहे. त्यामुळे कळंबसह राळेगाव मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक नागरिकांसाठी काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार डॉ.अशोक उईके यांनी कळंब येथे जलशुध्दीकरणासह नळयोजनेसाठी परिश्रम चालविले आहे. परंतु ही योजना लालफितशाहीत अडकली आहे. या योजनेला खुद्द मुख्यमंत्र्यानीच ‘पूश’ करण्याची गरज व्यक्त होत आहे.