डीएचओंच्या कारभाराने सीईओ अडचणीत
By Admin | Updated: January 3, 2015 02:07 IST2015-01-03T02:07:47+5:302015-01-03T02:07:47+5:30
ग्रामीण आरोग्याची नाडी असलेल्या जिल्हा आरोग्य विभागात गेल्या दिवसांपासून कुरबुरी सुरू आहे. पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीचा मोठा घोडेबाजार झाला.

डीएचओंच्या कारभाराने सीईओ अडचणीत
यवतमाळ : ग्रामीण आरोग्याची नाडी असलेल्या जिल्हा आरोग्य विभागात गेल्या दिवसांपासून कुरबुरी सुरू आहे. पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीचा मोठा घोडेबाजार झाला. यातून अनेक प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचली आहेत. आता न्यायालयाच्या अवमान प्रकरणात चक्क जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश मिळाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या कारभाराने सीईओ अडचणीत आले असून आरोग्य यंत्रणेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग ऐनकेन प्रकारे नेहमी वादात असतो. येथे कोणतेही काम नियमाला धरुन होत नाही. ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाले की मात्र काम बिनधोक होते. याचा फटका मात्र प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसतो. आपला व्यवहार निट चालावा यावरच अधिक भर दिला जातो.
आरोग्य संघटनांंनी आंदोलन पुकारावे अशी परिस्थिती येथे जाणीवपूर्वक तयार केली जाते. वरिष्ठांची दिशाभूल करून हेतू साध्य करण्याचा फंडा येथे वापरला जात आहे. जिल्हा मुख्यालयालगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी अंशत: बदलाचा कारभार केला जातो. औद्योगिक न्यायालयाने बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक हे रिक्त पद भरण्यासाठी स्थगनादेश दिला. त्यानंतरही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मर्जीतील कर्मचाऱ्याला येथे नियुक्ती दिली.
आरोग्य कर्मचारी सुहास माडुरवार आणि मधुसुदन पिंगळे यांची १३ मार्च २०१३ ला आरोग्य सहायक म्हणून पदोन्नती करण्यात आली. माडुरवार यांना थेरडी आरोग्य केंद्र तर पिंगळे यांना झरी येथे देण्यात आले. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी पदोन्नती घेण्यास नकार दिला.
त्यानंतर २२ सप्टेंबर २०१३ ला शिरसगाव आरोग्य केंद्र्रात सेवानिवृत्तीने रिक्त जागेवर पदोन्नती मिळण्यासाठी पिंगळे यांनी अर्ज करताच, त्यांना सात दिवसात नियुक्ती आदेश देण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी)