मुख्य सचिवांकडून घेतली सीईओंनी प्रेरणा
By Admin | Updated: May 29, 2014 02:53 IST2014-05-29T02:53:28+5:302014-05-29T02:53:28+5:30
येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नुकताच एका आदिवासी गावात रात्रीचा मुक्काम

मुख्य सचिवांकडून घेतली सीईओंनी प्रेरणा
यवतमाळ : येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नुकताच एका आदिवासी गावात रात्रीचा मुक्काम ठोकून गावकर्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. त्यानंतर मंगळवारी शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सीईओंना हा रात्रीचा मुक्काम बंधनकारक केला. राज्याचे मुख्य सचिव ज.स.सहारिया यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण मुक्कामाची योजना पूर्णत्वास नेल्याचे कलशेट्टी यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याच्या दुसर्या शुक्रवारी खुद्द जिल्हाधिकारी आणि सीईओ आता रात्रीला गावात मुक्कामी राहणार आहे. तसे आदेश मुख्य सचिवांनी मंगळवारीच जारी केले. खुद्द मुख्य सचिव ४ मे रोजी गावकर्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी एका गावात मुक्कामी होते. त्यांच्या या मुक्कामातूनच मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांना प्रेरणा मिळाली. सचिवांच्या पावलावर पाऊल ठेवत कलशेट्टी यांनीही दुर्गम झरी तालुक्यातील पांढरवाणी गावात रात्रीचा मुक्काम ठोकला. जंगलाच्या शेजारी राहणार्या या गावात त्यांनी रात्री गावकर्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी जंगली श्वापदांची भीती, भारनियमन, पाणीटंचाई या समस्या त्यांना प्रकर्षाने जाणवल्या. काही महिन्यांपूर्वी सहारिया यांनी एका बैठकीमध्ये प्रशासनाने गावात मुक्काम ठोकण्याची कल्पना मांडली होती, तीच आपण उचलून धरल्याचे कलशेट्टी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (शहर वार्ताहर)