कपाशी, सोयाबीन संकटात
By Admin | Updated: October 26, 2014 22:48 IST2014-10-26T22:48:01+5:302014-10-26T22:48:01+5:30
गेल्या दोन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस येत असल्याने खरिपातील ५३ हजार हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहे. कपाशी आणि सोयाबिनचे या वातावरणाने नुकसान होण्याची शक्यता

कपाशी, सोयाबीन संकटात
वणी : गेल्या दोन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस येत असल्याने खरिपातील ५३ हजार हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहे. कपाशी आणि सोयाबिनचे या वातावरणाने नुकसान होण्याची शक्यता असल्याने बळीराजा पुन्हा एकदा धास्तावला आहे. कापूस वेचणी आणि सोयबीन सवंगणीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड धावपळ होत आहे.
मृग नक्षत्रापासून दडी मारलेल्या पावसाने नंतर दोन दिवस संततधार हजेरी लावली होती. तत्पूर्वी महिनाभर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. पहिल्यांदा मोड आल्याने शेतकरी संकटात सापडले होते. अखेर कशी तरी वणी तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. मात्र पावसाअभावी तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवरवर शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती.
सध्या तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, ७ हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, ५ हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारी उभी आहे. आता कपाशी फुटली आहे. शेतात पांढरी बोंडे दिसत आहे. सोबतच सोयाबिनही आता सवंगणीला आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वीच सोयाबिनची सवंगणीही केली आहे. त्यांनी शेतातच सोयाबिनचे ढीग मारून ठेवले आहेत. काही शेते कापसाने पांढरी दिसू लागली आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस आणि ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
गेल्या शुक्रवारपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दिवसा आणि रात्रीही तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील कापूस ओला होत आहे. परिणामी त्याची प्रतवारी घसरण्याची चिंता सतावत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस कुटून आहे. मात्र दिवाळीमुळे वेचणीला मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे हा कापूस शेतातच ओला होत आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबिनची सवंगणी केली आहे. त्यांनी शेतात सोयाबिनचे ढिग लावले आहे. दिवाळीमुळे मजूर न मिळाल्याने त्यांना सोयाबीन काढता आले नाही. आता सोयाबिनचे हे ढिगही पावसाने ओले होत आहे.
यापूर्वी पावसाअभावी दुबार, तिबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे.
आधीच कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाच्या दडीने त्यांना दुसऱ्यांदा बियाणे घ्यावे लागले. आता पीक हातातोंडाशी आले असताना पुन्हा निसर्ग त्यांच्या अंत पाहात आहे. उभे पीक हातचे जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतही त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)