सर्वोच्च न्यायालयाच्या 'स्टे'वर राज्य सरकार टिकून - ॲड. प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 12:13 PM2022-10-15T12:13:34+5:302022-10-15T12:35:19+5:30

''राज्य सरकारवर अद्यापही टांगती तलवार''

case of split in Shiv Sena is pending; the state government is currently surviving due to the stay of Supreme Court - Adv. Prakash Ambedkar | सर्वोच्च न्यायालयाच्या 'स्टे'वर राज्य सरकार टिकून - ॲड. प्रकाश आंबेडकर

सर्वोच्च न्यायालयाच्या 'स्टे'वर राज्य सरकार टिकून - ॲड. प्रकाश आंबेडकर

googlenewsNext

यवतमाळ : शिवसेनेतील फुटीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आमदारांच्या अपात्रतेचा अर्जही अद्याप प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेमुळे सध्या राज्य सरकार टिकून आहे. या सरकारवर अद्यापही टांगती तलवार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (दि. १४) येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी ॲड. आंबेडकर शुक्रवारी यवतमाळ येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सध्याचे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेमुळे टिकून असल्याचे स्पष्ट केले. आमदारांच्या अपात्रतेच्या अर्जावर अद्याप निर्णय न झाल्याने सरकारवर टांगती तलवार असून न्यायालयाने ती त्वरित संपवावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी प्रशासकीय असफलता आणि घटनात्मक असफलता यावरही मतप्रदर्शन केले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी काही निर्णयांवरून सर्वोच्च न्यायालय स्वत:ला राजकीय वादात ओढवून घेत असल्याचे दिसून येते, असे सांगितले.

हिजाब बंदीच्या निर्णयावरही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे मतैक्य होत नाही, असे सांगितले. जेथे ड्रेस कोड लागू नाही, तेथे कुणीच गणवेशाची सक्ती करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र विदर्भ कधी होईल, या प्रश्नावर त्यांनी जेव्हा केंद्रातील सरकार जाण्याच्या मार्गावर असेल तेव्हा नक्कीच विदर्भ स्वतंत्र होईल, असे सांगितले.

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाला आपला विरोध अद्यापही कायम असून टोल माफ केल्यास एसटी महामंडळ नफ्यात येऊ शकते, असे सांगितले. सध्या एसटी महामंडळ वर्षाकाठी टोलपोटी अडीच हजार कोटी रुपयांचा भरणा करते. हा टोल माफ झाल्यास कर्मचाऱ्यांचा १२०० कोटींचा पगार देऊन महामंडळ १३ कोटींनी फायद्यात राहू शकते, असे त्यांनी सांगितले.

विलीनीकरणाला विरोध असला तरी एसटीच्या संपाला आपला पाठिंबा होता, असे त्यांनी कबूल केले. मात्र चालक, वाहक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना केवळ आपल्या वेतनाची चिंता असून महामंडळ कायम ठेवण्यासाठी ते इमानदारीने प्रयत्न करीत नसल्याचा आरोप केला. शिवनेरी बसेस भाड्याने घेतल्याने महामंडळाचे कंबरडे मोडले, असे त्यांनी सांगितले. हा मुद्दा कर्मचारी लोकांसमोर आणत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिवसेना, काँग्रेसकडून प्रतिसाद नाही

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसकडे युतीचा प्रस्ताव दिल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कबूल केले. मात्र अद्याप शिवसेना आणि काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचेही सांगितले. मात्र युती न झाल्यास राज्यभर सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी जात, धर्म, व्यवसाय पाहून मतदान न करता आपल्या हिताच्या लोकप्रतिनिधींना निवडून द्यावे, असे आवाहन केले. अन्यथा त्यांचीच फसवणूक होते, असेही स्पष्ट केले.

यवतमाळमध्ये उतरणार

वंचित बहुजन आघाडीने मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात आपली ताकद दाखवून दिली होती. आता यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच निवडणुकांत हा पक्ष रणांगणात उतरणार आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही वंचितचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे.

Web Title: case of split in Shiv Sena is pending; the state government is currently surviving due to the stay of Supreme Court - Adv. Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.