कार्लीच्या सिंचन तलावाला पडले भगदाड
By Admin | Updated: December 26, 2016 01:49 IST2016-12-26T01:49:22+5:302016-12-26T01:49:22+5:30
गावाला धोका, रबीच्या सिंचनावर प्रश्नचिन्ह, शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले नवीन संकट

कार्लीच्या सिंचन तलावाला पडले भगदाड
तलाव ७० टक्के रिकामा : गावाला धोका, रबीच्या सिंचनावर प्रश्नचिन्ह, शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले नवीन संकट
रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ
यवतमाळ ते पांढरकवडा मार्गावर कार्ली गावाजवळ जिल्हा परिषदेचे सिंचन तलाव बांधण्यात आले. या सिंचन तलावाला मोठे भगदाड पडले आहे. यातून धो-धो पाणी वाहत आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी सिंचन विभागाकडे तक्रारी दिल्या. मात्र भगदाड बुजविण्यासाठी शासनाने कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. यामुळे सिंचन तलावातील ७० टक्के पाणी आता वाहून गेले आहे. हे भगदाड गावकऱ्यांनी स्वत:च बुजविले असले तरी पाण्याचा अखंड झरा सुरूच आहे. यामुळे लाखो रूपयांचा निधी खर्च करून उभारलेल्या तलावाला भगदाड पडल्याने गावाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. रबीच्या सिंचनाचे स्वप्नही पाण्यासोबतच वाहून गेले.
यवतमाळ शहरापासून १५ किमी अंतरावर कार्ली गाव आहे. या गावातील उंच ठिकाणावर सिंचन तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. १९९० च्या सुमारास हे तलाव उभारण्यात आल्याचे गावकरी सांगतात. त्यावेळी तलावाच्या निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात ओलित होणार असल्याचे स्वप्न गावकऱ्यांना दाखविण्यात आले. सिंचन तलावात त्याकरिता स्वतंत्र जॅकवेल उभारण्यात आला आहे. या ठिकाणावरून मुख्य कालव्यापर्यंत लोखंडी पाईपलाईन टाकण्यात आली. जॅकवेल खुले केल्यानंतर त्यातून कॅनलच्या नाल्यात पाणी सोडले जाणार होते.
साधारणत: १९९४-९५ मध्ये पाणी सोडण्यात आले. यातून लोकांनी त्या काळात ओलित केले. दोन वर्षे सिंचन झाले. त्यानंतर कॅनलचा पाईप बुजल्याचे कारण सांगत पाणी सोडण्याचे काम थांबविण्यात आले. नंतर जॅकवेल खराब झाल्याचे कारण सांगण्यात आले. तेव्हापासून सिंचनाचा प्रयत्नच झाला नाही. केवळ सिंचन तलावात पाण्याची साठवणूक होत होती. काही दिवसांपूर्वी या तलावाला भगदाड पडले. यातून थोडे-थोडे पाणी जात होते. अलीकडे हे भगदाड मोठे झाले. यातून धो-धो पाणी वाहायला सुरूवात झाली. गावकऱ्यांनी सिंचन विभागाकडे तक्रार नोंदविली. मात्र कुणी या तलावाकडेही फिरकले नाही. यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेत मोठे दगड, माती, टाकून ते बुजविण्याचा प्रयत्न केला. यानंतरही पाण्याची धार सुरूच आहे. पूर्वीच्या प्रमाणात हे पाणी कमी आहे. मात्र येत्या पावसाळ्यात या तलावाची भिंत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे तलावखाली वसलेल्या गावांना धोका आहे. तलावाच्या दुरूस्तीच्या उपाययोजना झाल्या नाही. यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतापले आहेत.
लाखोंचा खर्च पाण्यात
जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी सिंचन तलाव उभारण्यात आले. त्यावर लाखोंचा निधी खर्च झाला. तलावाच्या निर्मितीनंतर त्याकडे दुर्लक्ष झाले. छोट्या उपाययोजनाही झाल्या नाही. यामुळे मुळ उद्देशालाच तडा गेला आहे. यातून सिंचन झालेच नाही. यामुळे ज्या भागात तलाव बांधण्यात आले. त्या ठिकाणचे उत्पादनही वाढले नाही. यातून लाखोंचा निधी पाण्यात गेला.
या ठिकाणच्या तलावाला पूर्वी छोटे भगदाड होते. आता हे भगदाड मोठे झाले. मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. यासंदर्भात कुठल्याही विभागाने लक्ष दिले नाही. शेवटी गावकऱ्यांनी हे भगदाड बुजविले.
- वैशाली अंजीकर,
माजी सरपंच कार्ली