मुकुटबनमध्ये लाखो रूपयांचा कापूस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:00:14+5:30

सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. मात्र वातावरणातील बदलामुळे सध्या खरेदी बंद आहे. बालाजी जिनिंगमध्ये आतापर्यंत ५९ हजार ७६३ क्विंटल २० किलो कापसाची खरेदी झाली, तर वसंत जिनिंगमध्ये २४ हजार २८ क्विंटल ४५ किलो कापसाची खरेदी झाली. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे जेसीबीद्वारे कापूस मोकळा करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर सदर जेसीबी मोकळ्या जागेत ठेवण्यात आली.

Burn cotton worth lakhs of rupees in Mukutban | मुकुटबनमध्ये लाखो रूपयांचा कापूस जळून खाक

मुकुटबनमध्ये लाखो रूपयांचा कापूस जळून खाक

ठळक मुद्देजिनिंगमधील घटना : जेसीबीच्या घर्षणाने आग लागल्याचा दावा, घटना संशयाच्या भोवऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
मुकूटबन : येथील पाटण-मुकूटबन मार्गावर असलेल्या बालाजी जिनिंगमध्ये ठेवून असलेल्या सीसीआयच्या कापूस गंजीला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत दीड हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस जळून खाक झाला. त्यात सीसीआयचे ८० ते ८५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे सीसीआयकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, या जिनिंगमध्ये दरवर्षीच कापूस गंजीला आग लागते. त्यामुळे ही आग लागते की, लावली जाते याबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याने ही आग संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुकुटबन येथील बालाजी जिनिंग व वसंत जिनिंगमध्ये आजपर्यंत सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. मात्र वातावरणातील बदलामुळे सध्या खरेदी बंद आहे. बालाजी जिनिंगमध्ये आतापर्यंत ५९ हजार ७६३ क्विंटल २० किलो कापसाची खरेदी झाली, तर वसंत जिनिंगमध्ये २४ हजार २८ क्विंटल ४५ किलो कापसाची खरेदी झाली. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे जेसीबीद्वारे कापूस मोकळा करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर सदर जेसीबी मोकळ्या जागेत ठेवण्यात आली. मात्र काही वेळातच कापसाच्या गंजीतून आगीचे लोळ बाहेर पडू लागले. त्यामुळे धावाधाव सुरू झाली. आग विझविण्यासाठी मजुरांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र सकाळच्या वेळी हवा सुटल्याने आगीचा प्रकोप वाढू नये, यासाठी येथील सिमेंट कंपनीमधील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर सकाळी १० वाजता वणी नगरपरिषदेचे अग्नीशमन दलही घटनास्थळी पोहोचले. या दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच, उपकेंद्र संचालक रत्नाकर पोटे हे मारेगावातून मुकूटबनला पोहोचले. घटनेच्यावेळी उपकेंद्र संचालक राठोड हे सुटीवर होते. जिनिंगमधील कामगार व उपस्थितांनी जेसीबी ट्रॅक्टर हे मध्ये उभे असल्याचे सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, ट्रॅक्टरच्या जेसीबीमधून कापूस जमा करताना घर्षण झाल्याने आग लागल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. या आगीसंदर्भात वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे.
रत्नाकर पोटे,
सीसीआय केंद्र उपसंचालक

Web Title: Burn cotton worth lakhs of rupees in Mukutban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.