सुटाबुटात येऊन चोरले नववधूचे दागिने; यवतमाळातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:20 IST2020-02-03T14:20:13+5:302020-02-03T14:20:36+5:30
यवतमाळ येथील बालकृष्ण मंगल कार्यालयात ३१ जानेवारीच्या रात्री लग्नसमारंभात सुटाबुटातील चोरट्यांनी जवळपास सहा लाखांवरील ऐवजावर डल्ला मारला.

सुटाबुटात येऊन चोरले नववधूचे दागिने; यवतमाळातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील बालकृष्ण मंगल कार्यालयात ३१ जानेवारीच्या रात्री लग्नसमारंभात सुटाबुटातील चोरट्यांनी जवळपास सहा लाखांवरील ऐवजावर डल्ला मारला. यात वधूचे दागिने व दोन लाख ७५ हजार रुपये असलेली रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. या घटनेमुळे लग्न समारंभात एकच खळबळ उडाली. दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
आकाश सुदाम निंगनूरकर यांच्या बहिणीचे आर्णी रोडवरील बालकृष्ण मंगल कार्यालय येथे लग्न होते. मुलीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्यात आले होते. शिवाय खर्चाकरिता दोन लाख ७५ हजार रुपये रोख सोबत घेतली होती. दागिने व रोख रक्कम आणि भेटस्वरूपात आलेले पैसे एका बॅगमध्ये ठेवण्यात आले होते. ही बॅग निंगनूरकर यांनी आईकडे दिली. लग्न आटोपल्यानंतर विधी चालू असताना भटजीला पुजेची सामुग्री देण्यासाठी निंगनूरकर यांच्या आईंनी हातातील बॅग खाली ठेवली व याच संधीचा फायदा वºहाडी बनून आलेल्या चोरट्यांनी घेतला. २० ते २५ वयोगटातील दोन युवक सुटाबुटात आले होते. त्यांनीच ही बॅग लंपास केली. मात्र बॅग गेल्याचे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेली होती. नातेवाईकांनी लग्न मंडपात व परिसरात शोधाशोध केली. कुणीही आढळून आले नाही. अखेर मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. यामध्ये २५ वयोगटातील अज्ञात तरुण ती बॅग बाहेर घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे. या आनंदाच्या सोहळ्यात चोरट्याने हातसाफ केल्याने या परिवाराला धक्काच बसला. मुलीच्या लग्नातच दागिने गेल्याने तिच्या आईलाही जबर धक्का बसला आहे. या प्रकरणी आकाश निंगनूरकर याने दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून लॉजची झडती
लग्न समारंभात सुटाबुटात आलेले चोरटे हे शहराबाहेरील असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे पोलिसांनी ३१ जानेवारी व त्याच्या दोन दिवसापूर्वी लॉजमध्ये मुक्कामी असलेल्यांची झाडाझडती घेणे सुरू केले आहे. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास पोलीस तपासाला गती मिळणार आहे.