काटखेडाच्या परिवारावर २५ वर्षांपासून बहिष्कार

By Admin | Updated: February 26, 2016 02:16 IST2016-02-26T02:16:20+5:302016-02-26T02:16:20+5:30

घटस्फोट झालेल्या पत्नीच्या मुलाला स्वीकारले नाही म्हणून पुसद तालुक्यातील काटखेडा येथील एका परिवारावर गत २५ वर्षांपासून जात पंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकला आहे.

Boycott of Katkheda family for 25 years | काटखेडाच्या परिवारावर २५ वर्षांपासून बहिष्कार

काटखेडाच्या परिवारावर २५ वर्षांपासून बहिष्कार

जात पंचायतीचा निर्णय : १६ जणांच्या कुटुंबाची न्यायासाठी धडपड
पुसद : घटस्फोट झालेल्या पत्नीच्या मुलाला स्वीकारले नाही म्हणून पुसद तालुक्यातील काटखेडा येथील एका परिवारावर गत २५ वर्षांपासून जात पंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकला आहे. ८० वर्षांच्या वृद्धासह १६ जणांचा हा परिवार बहिष्कृत म्हणून जगत आहे. न्यायासाठी पोलिसांचे दरवाजे ठोठावत असून अद्यापही जात पंचायतीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
पुसद तालुक्यातील काटखेडा येथे साखरे परिवार राहतो. हरिभाऊ बेगाजी साखरे यांनी पहिली पत्नी लीलाबाई हिला ३ फेब्रुवारी १९६८ रोजी घटस्फोट दिला. त्या फारकतनाम्यात या दाम्पत्याला कोणतीही संतती नसल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यांनतर हरिभाऊने अबिराबाईसोबत दुसरे लग्न केले. परंतु त्यानंतर लीलाबाईला झालेला मुलगा हरिभाऊचा असल्याचे सांगत तशी नोंद ग्रामपंचायतीत करण्यात आली. मात्र आपला मुलगा नसल्याचे हरिभाऊने सांगितले. त्यावरून प्रकरण जात पंचायतीत गेले. जात पंचायतीतील ११ सदस्यांनी या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केले. साखरे परिवाराच्या घरी कुणीही जाऊ नये, समाजाच्या कार्यक्रमात बोलवू नये, असे ठरविण्यात आले. यामुळे साखरे परिवार एकाकी झाला. एवढेच नाही तर काही मंडळी या परिवाराला त्रास देऊ लागले. त्यामुळे हरिभाऊच्या विनोद नामक मुलाने गाव सोडले, तर दोन मुलासह आजही हरिभाऊ काटखेडा येथे राहतो. त्यांना आता समाजातील मंडळी विशेषत: जात पंचायतीचे सदस्य त्रस्त करून सोडत आहे. या प्रकरणी साखरे परिवाराने पुसद ग्रामीण पोलीस ठांण्यात तक्रार केली. मात्र दखल घेतली नाही.
त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही न्याय मागितला. परंतु उपयोग झाला नाही. शेवटी प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. उच्च न्यायालयाने या प्रकरणी जात पंचायतीच्या सदस्यांना चांगल्या वर्तणुकीची तंबी दिली. परंतु या तंबीचा फारसा फरक पडलेला नाही. कारण काही दिवसानंतर आता पुन्हा या मंडळींनी त्रास देणे सुरू केले आहे.
गेल्या २५ वर्षांपासून साखरे परिवार उपेक्षिताचे जीणे जगत आहे. न्यायासाठी धडपडत आहे. परंतु कुणीही न्याय देत नाही. विशेष म्हणजे सामाजिक बहिष्कार टाकणे कायद्याने गुन्हा आहे. त्याबाबत संबंधितांवर कठोर कारवाईचे निर्देश असून दखलपात्र गुन्हा नोंदविता येतो. परंतु साखरे परिवाराला अद्यापही न्याय मिळाला नाही.

Web Title: Boycott of Katkheda family for 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.