हलगर्जीपणामुळे बालक दगावला
By Admin | Updated: October 26, 2014 22:46 IST2014-10-26T22:46:22+5:302014-10-26T22:46:22+5:30
एका नऊ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना येथील जोशी बालरूग्णालयात घडली. घटनेनंतर मृत बालकाच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे काहीकाळ रूग्णालयात तणावाचे

हलगर्जीपणामुळे बालक दगावला
यवतमाळ : एका नऊ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना येथील जोशी बालरूग्णालयात घडली. घटनेनंतर मृत बालकाच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे काहीकाळ रूग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वडगाव रोड पोलीस तत्काळ तेथे पोहोचले आणि नातेवाईकांची समजूत काढली.
यश मनोज हातागडे (९) रा. नेताजीनगर असे मृत बालकाचे नाव आहे. पोटात त्रास होत असल्याने शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वडील मनोज हातागडे यांनी त्याला डॉ. संजीव जोशी यांच्या जोशी बाल रूग्णालयात उपचारासाठी नेले. रूग्णांची गर्दी असल्याने यशच्या तपासणीसाठी दुपारी ४ वाजले. तपासणी करून डॉ. जोशी यांनी रक्ताची तपासणी करण्यास सांगितले. सायंकाळी ६ वाजता रक्त तपासणीचा अहवाल आला. तो पाहून डॉ. जोशी यांनी कुठलाही गंभीर आजार नसल्याचे मनोज हातागडे यांना सांगितले. त्यानंतर सलाईन देऊन डॉक्टर निघून गेले. मात्र यशच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. याउलट त्याचा त्रास वाढला. तेव्हा यशचे वडील मनोज यांनी ही बाब तेथील परिचारिकेच्या लक्षात आणून दिली. मात्र त्यांनी डॉक्टरांना झोपेतून उठविण्यास नकार दिला. अखेर रात्री १२.३० वाजताच्या सुमारास यशचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच वडगाव रोड पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेनंतर मनोज हातागडे यांनी ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांना तक्रार दिली. तूर्तास ही तक्रार चौकशीत ठेवली आहे. रविवारी दुपारी यशच्या मृतदेहाचे पोलीस, पंच आणि व्हिडिओ चित्रिकरणात शवविच्छेदन करण्यात आले. यासंदर्भात ठाणेदार जाधव यांना विचारणा केली असता उत्तरीय तपासणी अहवाल आणि तज्ञ डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करणार असल्याचे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)