पुसद : शेतीच्या वादात एका तरुणाने आपल्या सावत्र आईचा काठीने बेदम मारहाण करून खून केला तर सावत्र बहीणही या मारहाणीत गंभीर जखमी झाली. ही घटना पुसद तालुक्यातील शेलू येथील एका शेतात घडली. बेबीबाई नामदेव कांबळे (५०) असे मृत महिलेचे नाव आहे. तर मनीषा नामदेव कांबळे (१९) असे जखमी तरुणीचे नाव आहे. जखमी तरुणीवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. शेलू खुर्द शिवारातील एका शेतात बेबीबाई कांबळे आपली मुलगी मनीषासह राहत होती. सावत्र मुलगा विठ्ठल नामदेव कांबळे (२६) रा. शेलू खुर्द हल्ली मु. उमरखेड हा शेतीतील हिस्सा मागत होता. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. रविवारी दुपारीही याच कारणावरून विठ्ठलने वाद घातला. विठ्ठलने आपली सावत्र आई बेबी हिच्यावर काठीने जबर वार केले. आईला मारहाण होत असल्याचे पाहून मनीषा सोडविण्यासाठी गेली. मात्र तिलाही बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत बेबीचा मृत्यू झाला. तर मनीषा गंभीर जखमी झाली. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आरोपी विठ्ठल कांबळेला अटक केली. (प्रतिनिधी)
मुलाने केला सावत्र आईचा खून
By admin | Updated: October 13, 2014 23:27 IST