सीमेवरील दारू दुकानदार ‘खूश’
By Admin | Updated: January 28, 2015 23:40 IST2015-01-28T23:40:25+5:302015-01-28T23:40:25+5:30
चंद्रपुरातील दारूबंदीमुळे या जिल्ह्याच्या सीमारेषेजवळ असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव आणि राळेगाव तालुक्यातील दारू दुकानदारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. या तिनही तालुक्यात आता

सीमेवरील दारू दुकानदार ‘खूश’
के.एस.वर्मा - राळेगाव
चंद्रपुरातील दारूबंदीमुळे या जिल्ह्याच्या सीमारेषेजवळ असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव आणि राळेगाव तालुक्यातील दारू दुकानदारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. या तिनही तालुक्यात आता चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यशौकीनांची गर्दी वाढणार आहे. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर येत असलेला अनुभव लक्षात घेता ही बाब स्पष्ट आहे. दरम्यान, चंद्रपुरातील दारू दुकाने यवतमाळ जिल्ह्यात स्थानांतरीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
वर्धा जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, कळंब, राळेगाव या तालुक्यातील वर्धा जिल्ह्याच्या सीमारेषेजवळ असलेल्या अनेक गावात दारू दुकाने, बियर बार अघडले गेले. या दुकानांमध्ये पूर्वीच्या तुलनेत ग्राहकी आणि दारूविक्री वाढली. विक्रेते मालामाल झाले. आता चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होत आहे. त्यामुळे सीमारेषेवरील यवतमाळ जिल्ह्यातील गावांमध्येही दुप्पट किंवा त्यापेक्षाही अधिक गर्दी वाढणार आहे. विक्री वाढून दुकानदारांची कमाई अनेक पटीने वाढणार आहे. नवीन दुकाने या क्षेत्रात वाढण्याची शक्यताही नाकारत येत नाही.
दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाडा या मागासलेल्या भागाचा अभ्यास करून केळकर समितीने सादर केलेल्या आपल्या अहवालात यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे दारू हेही एक कारण असल्याचे नमूद करत जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीची शिफारस केली आहे. समितीने सादर केलेल्या अहवालावर करावयाच्या कारवाईसाठी गठित समितीचे प्रमुख महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आहे. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात प्रबळ लिकर लॉबीचा विरोध झुगारून, त्यांचा विरोध पत्करून या जिल्ह्यात दारूबंदी यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. तेच मंत्री या समितीच्या अहवालावर अंतिम निर्णयाची शिफारस करणार असल्याने यवतमाळ जिल्ह्यातही दारूबंदीची अपेक्षा वाढली आहे.