जिल्ह्यात बोगस बीटी बियाणे दाखल
By Admin | Updated: May 28, 2014 00:01 IST2014-05-28T00:01:56+5:302014-05-28T00:01:56+5:30
केंद्रीय कृषी मंत्रालयाची परवानगी मिळण्यापूर्वीच बीजी-३ हे बोगस बीटी बियाणे चोरट्या मार्गाने यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले आहे. याबाबत कृषी खाते अनभिज्ञ नाहीत. मात्र त्यांच्याकडून

जिल्ह्यात बोगस बीटी बियाणे दाखल
कारवाईचा केवळ देखावा : यवतमाळ : केंद्रीय कृषी मंत्रालयाची परवानगी मिळण्यापूर्वीच बीजी-३ हे बोगस बीटी बियाणे चोरट्या मार्गाने यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले आहे. याबाबत कृषी खाते अनभिज्ञ नाहीत. मात्र त्यांच्याकडून कारवाईचा केवळ देखावा निर्माण केला जात आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग बोगस बीटी विक्रेत्यांच्या दावणीला बांधला गेला आहे. नामांकित कंपनीचे बीजी-३ हे बियाणे सध्या प्रयोगावर आहे. बीजी-१ मध्ये हिरव्या बोंड अळीला प्रतिबंध घालणारे जिन्स टाकण्यात आले होते. बीजी-२ मध्ये सर्व बोंड अळ्यांना मारणारे जिन्स होते. आता बीजी-३ हे नवीन कॉटन बियाणे प्रयोगावर आहे. हे बियाणे पेरल्यानंतर त्यावर तणनाशक फवारता येईल. त्यामुळे पर्हाटी जळणार नाही, असा दावा केला जात आहे. मजुरांच्या अडचणीवर मात करणारे हे बियाणे राहणार आहे. सध्या प्रयोगावर असल्याने केंद्र शासनाने अद्याप बीजी-३ या बियाण्याला मंजुरी दिलेली नाही. या प्रक्रियेला आणखी किमान दोन वर्ष लागण्याची शक्यता कृषी सूत्रांनी वर्तविली. मात्र मंजुरीपूर्वीच गुजरात व आंध्रप्रदेशात बीजी-३ हे कपाशीचे बियाणे अवैधरीत्या यवतमाळ जिल्ह्यात आणले जात आहे. मंजुरी न मिळाल्याने हे बियाणे कृषी खात्याच्या दृष्टीने बोगस म्हणून गणले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव तालुका आणि बहुतांश पांढरकवडा, वणी, झरी, मारेगाव, घाटंजी या तालुक्यात बोगस बीटी बियाणे शेतकर्यांच्या माथी मारले जात आहे. एक हजार रुपयात या बीटी बियाण्याचे पॅकेटस् मिळत आहे. तणनाशक मारावे लागणार नाही आणि मारले तरी पर्हाटी जळणार नाही अशी भलावण शेतकर्यांची केली जात आहे. शेतकरी वर्ग त्याला बळी पडत आहे. परंतु सांगितलेल्या दाव्याची कोणतीही हमी नाही. या बोगस बीटी बियाण्याचे आंध्रप्रदेशात आणि बुलडाणा जिल्ह्यात पुरवठादार आहेत. पाटणबोरी भागातील काही कृषी केंद्रातून आणि बाभूळगाव तालुक्यातील काही कृषी केंद्रातून या बोगस बीटी बियाण्यांची विक्री केली जात असल्याची माहिती कृषी खात्याला मिळाली आहे. पांढरकवडा येथे विक्रेत्याच्या घरी या बियाण्याचा साठा आहे. तेथूनच खबरदारी घेऊन या बियाण्याची विक्री व इतर कृषी केंद्रांना पुरवठा केला जात आहे. एकट्या वणी-पांढरकवडा विभागात २0 ते २५ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर या बोगस बीटीची लागवड केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात आधीच सोयाबीनचे बोगस बियाणे विकले जात आहे. तीन हजार रुपये क्विंटलचे सोयाबीन घेऊन थेट नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये भरुन आठ हजार रुपये क्विंटलने विकले जात आहे. त्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नाही किंवा त्याची उगवण क्षमता तपासली गेलेली नाही. हा काळाबाजार सुरू असतानाच आता कपाशीच्या बोगस बीटी बियाण्यांची विक्री सुरू असल्याची बाब पुढे आली. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग मात्र या बोगस बियाण्यांबाबत धृतराष्ट्राची भूमिका घेत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)