बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला
By Admin | Updated: December 25, 2014 23:38 IST2014-12-25T23:38:39+5:302014-12-25T23:38:39+5:30
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह विहिरीत आढळून आला. ही घटना गुरूवारी सकाळी यवतमाळ मार्गावरील किन्ही येथील शेतात उघडकीस आली.

बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला
हिवरी : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह विहिरीत आढळून आला. ही घटना गुरूवारी सकाळी यवतमाळ मार्गावरील किन्ही येथील शेतात उघडकीस आली. घटनास्थळ जंगलात असल्याने मुलगी तेथे पोहोचली कशी, घातपात तर झाला नाही ना, असा संशय व्यक्त होत आहे.
मोहिनी किरण गायकवाड (१६) रा. झाडकिन्ही असे मृत मुलीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून ती विमनस्क वागायची. त्यामुळे यवतमाळच्या दांडेकर ले-आऊटमध्ये राहणाऱ्या अश्विनी किरण गायकवाड या मोठ्या बहिनीने महिनाभरापूर्वी तिला आणले. २३ डिसेंबरपासून ती घरून बेपत्ता झाली. तिचा शोध घेतला, मात्र आढळून आली नाही. त्यामुळे मोहिनी हरविल्याची तक्रार वडगाव रोड ठाण्यात दिली होती. गुरूवारी सकाळी किन्ही शिवारातील शेतात कामासाठी पंडीत आखरे गेले असता त्यांना कुजल्यासारखा वास आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर काळी टी-शर्ट आणि जिन्स घातलेली मुलगी त्यांना मृतावस्थेत दिसली. घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना दिली. त्यावरून फौजदार मिश्रा, जमादार नरेंद्र लावरे, महेश फुन्से, नरेश खरतडे आदी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला.
घटनेची माहिती परिसरात पसरताच मोहिनीचे नातेवाईकही तेथे पोहोचले. यावेळी त्यांनी मृतदेहाची पाहणी करून ती मोहिनीच असल्याची ओळख पटविली. पोलिसांनी तुर्तास याप्रकरणी अकस्मात घटनेची नोंद घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मात्र मोहिनीचा घातपात झाला असावा असा संशयही व्यक्त होत आहे. (वार्ताहर)