संचालक मंडळ दोन वर्षांपासून ‘प्रभारी’
By Admin | Updated: January 6, 2015 23:07 IST2015-01-06T23:07:45+5:302015-01-06T23:07:45+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ तब्बल दोन वर्षांपासून प्रभारी असल्याने बँकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो आहे. बँकेची रखडलेली ३५० जागांची नोकरभरती हा

संचालक मंडळ दोन वर्षांपासून ‘प्रभारी’
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ तब्बल दोन वर्षांपासून प्रभारी असल्याने बँकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो आहे. बँकेची रखडलेली ३५० जागांची नोकरभरती हा या परिणामाचाच एक भाग मानला जात आहे.
जिल्हा बँकेच्या २८ सदस्यीय संचालक मंडळाचा कार्यकाळ डिसेंबर २०१२ ला संपला. त्यानंतर बँकेच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र शासनाची तयारी नसल्याने निवडणूक आयोगाने शासनाला या निवडणुकांसाठी मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ जिल्हा बँक संचालकांच्या सोईचीच होऊन गेली. त्यानंतर लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आल्याने बँकेच्या या संचालक मंडळाचे चांगलेच फावले. पाहता पाहता या संचालक मंडळाला मुदत संपून डिसेंबर २०१४ मध्ये दोन वर्ष पूर्ण झाले. मात्र आपला पाच वर्षाचा कार्यकाळ संपला म्हणून कुण्याही संचालकाने पदाचा राजीनामा देण्याची, बँकेवर प्रशासक बसवा असे म्हणण्याचे धाडस दाखविलेले नाही. यावरून या संचालकांचे २३०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या बँकेच्या खुर्चीवरील ‘प्रेम’ लक्षात येते.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा बँकेत प्रभारी संचालक मंडळ असल्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धोरणे राबविताना बँकेला अडचणी निर्माण होत आहे. एक तर बँकेला ठोस धोरणात्मक निर्णय या प्रभारी संचालक मंडळाच्या कार्यकाळात घेता येत नाही. आर्थिक बाबींवरील निर्णय थांबत नसले तरी नोकरभरती सारखे निर्णय दोन वर्षांपासून रखडले आहेत. जिल्हा बँकेची मुख्य शाखा, विभागीय शाखा व ग्रामीण शाखा मिळून ८९ कार्यालये आहेत. अवघ्या ५३० कर्मचाऱ्यांवर या कार्यालयांचा डोल्हारा चालविला जात आहे. बँकेला ३५० लिपिक-शिपाई आदी कर्मचाऱ्यांची तातडीने आवश्यकता आहे. मात्र पूर्णवेळ संचालक मंडळ नसल्याने या जागा भरणे कठीण होत असल्याचे सहकार विभागातून सांगण्यात आले. बँकेच्या निवडणुका पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात घेतल्या जात होत्या. आता मात्र त्यासाठी सहकार विभागाला मधुकरराव चौधरी हे स्वतंत्र निवडणूक आयुक्त आहेत. जिल्हा उपनिबंधकांना निवडणूक घेण्याचा हा अधिकार दिला जाऊ शकतो. जिल्हा बँकेने १७०० मतदारांचा समावेश असलेली अपडेट यादी उपनिबंधकांना सादर केली आहे.
त्यात जिल्हास्तरीय मतदारसंघात सर्व १७०० मतदार मतदान करणार असून तालुकास्तरीय मतदारसंघात ४० ते ४५ मतदार राहणार आहे. पूर्वी २८ संचालक होते. बैद्यनाथन समितीच्या शिफारसीनंतर ही संख्या २१ वर मर्यादित करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)