भारतीय स्टेट बँकेवर सदोष सेवेचा ठपका

By Admin | Updated: March 21, 2015 02:14 IST2015-03-21T02:14:46+5:302015-03-21T02:14:46+5:30

संपूर्ण देश कार्यक्षेत्र असलेल्या भारतीय स्टेट बँकेकडूनही सदोष सेवा दिली जाते, याचा प्रत्यय येथे आला.

Blame for faulty service on State Bank of India | भारतीय स्टेट बँकेवर सदोष सेवेचा ठपका

भारतीय स्टेट बँकेवर सदोष सेवेचा ठपका

यवतमाळ : संपूर्ण देश कार्यक्षेत्र असलेल्या भारतीय स्टेट बँकेकडूनही सदोष सेवा दिली जाते, याचा प्रत्यय येथे आला. ग्राहकांना सदोष सेवा देऊन जाण’वपूर्वक खर्चात टाकण्याचा आणि मानसिक व शारीरिक त्रासाचा प्रकार या बँकेकडून झाल्याचा ठपका जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने ठेवला आहे.
दिवंगत खातेदाराच्या वारसांना चुकीचे मार्गदर्शन केल्याने भारतीय स्टेट बँकेला ७६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. येथील बोरेले ले-आऊटमधील अर्चना फुलझेले यांच्या तक्रारीवर यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने हा आदेश दिला आहे.
अर्चना फुलझेले यांचे पती वसंतराव उद्धवराव फुलझेले यांचे भारतीय स्टेट बँकेच्या नेर शाखेत ११ लाख ५६ हजार १६३ रुपये जमा होते. दरम्यान, वसंतराव यांचे १९ जुलै २०१२ रोजी निधन झाले. त्यांच्या खात्यातील रक्कम मिळावी यासाठी पत्नी अर्चना आणि मुलगा महेश यांनी बँकेकडे अर्ज केला. त्यावेळी त्यांना बँकेने वारसाचे प्रमाणपत्र मागितले. सदर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांना कोर्ट फी स्टॅम्प ७५ हजार रुपये यासह वकिलाची फी, वृत्तपत्रात जाहिरातीचा खर्च आणि इतर असा दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च झाला.
मात्र बँकेने वारसा प्रमाणपत्राची गरज नसल्याचे सांगितले. यावर अर्चना फुलझेले यांनी बँकेला विचारणा करत झालेल्या खर्चाची भरपाई मिळावी, अशी विनंती केली. तेव्हा बँकेने हात वर केले. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयाचे दार ठोठावले. मंचचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सदस्य अ‍ॅड.आश्लेषा दिघाडे, डॉ. अशोक सोमवंशी यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मंचाने फुलझेले यांच्या बाजूने निर्णय दिला. बँकेने त्यांना सदोष सेवा दिल्याचा ठपका ठेवण्यात आला.
भारतीय स्टेट बँकेच्या नेर व यवतमाळ शाखेने फुलझेले यांना वारसा हक्क प्रमाणपत्र मिळविण्यासाठी करावा लागलेला स्टॅम्पचा खर्च ७५ हजार, वकिलाची फी आणि वृत्तपत्रात जाहिरातीसाठी आलेला एक हजार ५०० रुपये खर्च असे एकूण ७६ हजार ५०० रुपये द्यावे, असे आदेशात नमूद केले आहे. शिवाय शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी तीन हजार रुपये व तक्रारीचा खर्च एक हजार रुपये तत्काळ द्यावे, असेही म्हटले आहे. या प्रकरणात फुलझेले यांची बाजू अ‍ॅड.मंगेश गंगलवार यांनी मांडली. (वार्ताहर)

Web Title: Blame for faulty service on State Bank of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.