रेशनच्या तांदळाच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश; ५७ लाख ६४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:25 IST2025-05-02T13:24:45+5:302025-05-02T13:25:36+5:30
एलसीबी पथकाची कारवाई : दिग्रसच्या दोघांवर गुन्हा दाखल

Black market of ration rice exposed; Goods worth Rs 57 lakh 64 thousand 200 seized
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रेशनच्या तांदळाची काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी आर्णी, यवतमाळ मार्गे गोंदिया येथे वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ट्रक पकडला. ही कारवाई मनदेव घाटात करण्यात आली. ५७ लाख ६४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शेख मोहसीन शेख कादर (वय ३४, रा. देऊरवाडी पुनर्वसन, दिग्रस), हाफीज बेग सनाउल्ला बेग (वय ३४, रा. बाराभाई मोहल्ला, दिग्रस) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रेशन दुकानासाठी शासनाकडून पाठविल्या जाणाऱ्या तांदळाची हेराफेरी करून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. दरम्यान, २६ एप्रिल रोजी एलसीबीचे पथक पेट्रोलिंग करीत असताना रेशनच्या तांदळाचा ट्रक गोंदिया येथे जाणार असल्याचे कळाले. त्यावरून पथकाने मनदेव घाटात सापळा रचला.
यावेळी एमएच २९ बीई ८५३२ क्रमांकाचा ट्रक येताना दिसताच पथकाने अडवून चौकशी केली. यावेळी ट्रकमधील तांदळाबाबत आरोपींना विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तांदळाची वैध कागदपत्रे, बिल आढळून न आल्याने पथकाचा संशय पक्का झाला. त्यांनी ट्रकसह आरोपींना ताब्यात घेतले.
यवतमाळ तहसीलदारांकडून तांदूळ रेशनचा आहे की नाही, या संबंधाने अहवाल मागितला. तांदूळ रेशनचा असल्याचा अहवाल प्राप्त होताच आरोपींवर यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय संतोष मनवर, योगेश गटलेवार, अजय डोळे, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, नीलेश राठोड, रितुराज मेडवे, आकाश सहारे यांनी केली.