मुंबईतील बैठकीसाठी भाजपाचे शक्तिप्रदर्शन
By Admin | Updated: June 28, 2014 23:47 IST2014-06-28T23:47:03+5:302014-06-28T23:47:03+5:30
भाजपाच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी जिल्ह्यातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनी केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना आपल्या वाहनात बसविण्याकरिता

मुंबईतील बैठकीसाठी भाजपाचे शक्तिप्रदर्शन
यवतमाळ : भाजपाच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी जिल्ह्यातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनी केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना आपल्या वाहनात बसविण्याकरिता या नेत्यांमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे.
लोकसभेतील विजय आणि आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी या अनुषंगाने २ व ३ जुलै रोजी मुंबईत भाजपची बैठक होत आहे. या बैठकीसाठी भाजपाचे तालुकास्तरापर्यंत प्रमुख पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी व नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभेच्या तयारीचा भाग म्हणून ही बैठक होत असल्याने भाजपाच्या नेत्यांकडून यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. या बैठकीत जिल्ह्यातील भाजपाच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. कुणी पदाधिकारी आपल्या विरोधात तेथे बोलू नये, या दृष्टीनेही मनधरणी होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी इच्छा नसूनही जुळवून घेतले जात आहे.
मुंबईतील या बैठकीत शक्ती प्रदर्शन करायचे म्हणून जिल्ह्यातील विधानसभेचे इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहे. कुणी ट्रॅव्हल्स, कुणी खासगी वाहने तर कुणी रेल्वेचे बुकिंग केले आहे. जिल्हाभरातून दीडशे ते दोनशे कार्यकर्ते बैठकीला जावू शकतात. यातील जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्या वाहनात बसावे, या माध्यमातून आपली शक्ती दिसावी असा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांपुढेही नेमके कुणाच्या गाडीत बसावे, असा पेच निर्माण झाला आहे.
यवतमाळच नव्हेतर भाजपाच्या वाट्याला असलेल्या राळेगाव, आर्णी, उमरखेड या विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनीसुद्धा कार्यकर्त्यांची अशीच जुळवाजुळव चालविली आहे. परंतु त्यासाठी त्यांना बरीच कसरत करावी लागत असल्याचे दिसून येते. ३० जून रोजी भाजपच्या कार्यकर्त्यांची ही फौज वेगवेगळ्या मार्गाने मुंबईकडे कुच करणार आहे. भाजपची ही बैठक लोकसभेतील यशासंदर्भात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या कौतुकासाठी होत असल्याचे सांगितले जाते. आपल्या सोयीने बैठकीचा अर्थ घेऊन श्रेष्ठींसमोर आपली लोकाभिमुख प्रतिमा दाखविण्याचा खटाटोप सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)