भाजपात पसरली नीरव शांतता
By Admin | Updated: June 26, 2014 00:02 IST2014-06-26T00:02:24+5:302014-06-26T00:02:24+5:30
वणी विभानसभा क्षेत्रातील भाजपात लोकसभा निवडणुकीनंतर नीरव शांतता पसरली आहे. विधानसभा निवडणुकीबाबत या पक्षात अनुत्सुकता दिसून येत असून केवळ महायुतीत वणीची जागा

भाजपात पसरली नीरव शांतता
विधानसभेबाबत अनुत्सुकता : दावेदारीचे पिल्लू सोडून स्थानिक नेते झाले मोकळे
रवींद्र चांदेकर - वणी
वणी विभानसभा क्षेत्रातील भाजपात लोकसभा निवडणुकीनंतर नीरव शांतता पसरली आहे. विधानसभा निवडणुकीबाबत या पक्षात अनुत्सुकता दिसून येत असून केवळ महायुतीत वणीची जागा भाजपाला देण्याच्या मागणीचे पिल्लू सोडून या पक्षाचे स्थानिक नेते मोकळे झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कमालीचे सक्रिय झाले होते. युतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या विजयासाठी हे पदाधिकारी, कार्यकर्ते घाम गाळताना दिसत होते. निवडणुकीत अहीर यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी जल्लोषही केला होता. या जल्लोषानंतर आता भाजपात नीरव शांतता पसरली आहे. भाजपाचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तूर्तास विश्रांती घेत आहे. विधानसभा निवडणुकीत वणीची जागा युतीत शिवसेनेच्या वाट्याला असल्याने भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तूर्तास आराम करीत आहे.
विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहणार असल्याने वणीतून शिवसेनेचाच उमेदवार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शांत दिसून येत आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी या पक्षाने पक्ष पातळीवर वणीची जागा भाजपाला देण्याची मागणी करून खळबळ उडवून दिली आहे. वणीची जागा मागून या पक्षाने केवळ एक पिल्लू सोडून दिले. खरा ‘डाव’ मात्र वेगळाच असल्याची चर्चा आहे. यावेळी युतीच्या उमेदवाराला पुन्हा चारी मुंड्या ‘चित’ करून पुढील सन २0१९ च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा भाजपाच्या पदरात पाडून घेण्याचा ‘डाव’ आखला जात आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत सहभागी पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला फिरली आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारामागे युतीत सहभागी असलेल्या पक्षांचे कोणते नेते किती जोमदारपणे सक्रिय होतील, हे बघणे आता मनोरंजक ठरणार आहे. कारण इतर पक्षांप्रमाणे भाजपातही गेल्या काही वर्षात गटबाजी उफाळली आहे. जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि शहर पदाधिकारी, वेगवेगळ्या दिशांना तोंड करून असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांत भाजपाचे काही पदाधिकारी, कार्यकर्तेही चांगलेच ‘सुदृढ’ झाले आहेत. त्यातून पक्षावर ताबा ठेवण्यासाठी प्रचंड चुरसही सुरु आहे.
खासदार अहीर यांच्यासाठी मात्र स्थानिकचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटतात. अहीर यांनी या सर्वांना एकत्रित ठेवण्यात चांगलेच यश प्राप्त केले आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्याही वापरल्या आहेत. अमुकाला तमुक क्षेत्र, तर तमुकाला अमुक क्षेत्र, अशी वाटणी करून त्यांनी पक्षात मेळ साधला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनाही या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना युतीच्या उमेदवारासाठी काम करायला लावणे, चांगलेच जड जाण्याची शक्यता आहे. वणी विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाटणीला असल्याने भाजपात तूर्तास या निवडणुकीबाबत अनुत्सुकता दिसून येत आहे. परिणामी पक्षात आता शांतता आहे. विधानसभेत भाजपाचा उमेदवारच राहणार नसल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते निश्चिंत आहेत.