भाजपा, शिवसेनेच्या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
By Admin | Updated: October 28, 2016 01:58 IST2016-10-28T01:58:23+5:302016-10-28T01:58:23+5:30
नगरपरिषद आणि नगराध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड

भाजपा, शिवसेनेच्या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
नगराध्यक्ष निवडणूक : नगरपरिषदेत युतीसाठी प्रयत्न
यवतमाळ : नगरपरिषद आणि नगराध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि भाजपाचे नेते ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांची राजकीय प्रतिष्ठापणाला लागली आहे. दरम्यान भाजपा-सेनेचे युतीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. ही युती झाल्यास नगराध्यक्षाचा उमेदवार कुणाचा यावरून रस्सीखेच होणार आहे.
जिल्ह्यातील दहा पैकी आठ नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे आपल्या पक्षाची सदस्य संख्या वाढावी यावर कमी आणि नगराध्यक्ष आपला असावा यावर अधिक भर दिला जात आहे. विधानसभेच्या बरोबरीची मतदारसंख्या असलेल्या नगराध्यक्ष निवडणुकीला वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. जनतेतून निवडून येणाऱ्या या नगराध्यक्षाकडे विधानसभेसाठी पर्यायी सक्षम उमेदवार म्हणूनसुद्धा पाहिले जाणार आहे. यवतमाळ नगरपरिषदेसाठी शिवसेना व काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजपा मात्र अजूनही ‘ही की ती’ या संभ्रमात दिसत आहे. शिवसेनेचा उमेदवार सर्वप्रथम जाहीर करून पालकमंत्री संजय राठोड यांनी आघाडी घेतली आहे. कुणबी-मराठा समाज एकजुटीने या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काँग्रेसनेही नगराध्यक्ष पदासाठी एका मोठ्या समाजाला नेतृत्व दिले आहे. दलित, मुस्लीम-अल्पसंख्यक, आदिवासी मतदारांवर काँग्रेसची मदार राहणार आहे. भाजपामध्ये अद्याप ब्राम्हण उमेदवार द्यायचा की ब्राम्हणेत्तर याच्यावर एकमत झालेले नाही. नियोजित उमेदवाराशिवाय इतरही समाजात चाचपणी केली जात आहे. कुणबी मतांचे अधिक विभाजन व्हावे म्हणून विरोधी बाकावरील मित्राच्या पक्षाला त्या समाजाचे उमेदवार उभे करण्याचा संदेश पोहोचला आहे. राष्ट्रवादी, बहुजन समाज पक्षात मात्र फारशा हालचाली दिसत नाहीत. राष्ट्रवादीत सध्या दोन नावे अजेंड्यावर असल्याचे कार्यकर्त्यांच्या गोटातून समजते.
यवतमाळच्या नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीने जिल्ह्यातील संजय राठोड व मदन येरावार या दोनही मंत्र्यांची कसोटी लागणार आहे. त्यातही स्थानिक आमदार असल्याने ना. मदन येरावार यांची शहरावर पकड किती हे स्पष्ट होणार आहे. शहरातील २८ प्रभागातून ५६ नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यांची अधिकाधिक संख्या आपल्या पक्षाकडे असावी या दृष्टीने सर्वच जण प्रयत्नरत असले तरी खरी ताकद नगराध्यक्ष पदासाठी खर्ची घातली जात आहे. काँग्रेसकडेही माणिकराव ठाकरे यांच्या रुपाने लालदिवा आहे. या लालदिव्याचा यवतमाळच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर किती प्रकाश पडतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
आजी-माजी आमदारांचीही कसोटी
मंत्र्यांप्रमाणेच जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांचीही नगरपरिषद व नगराध्यक्ष निवडणुकीत कसोटी लागणार आहे. वणीचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, घाटंजी-आर्णीसाठी प्रा. राजू तोडसाम, दारव्हा-दिग्रसमध्ये संजय राठोड, पुसदमध्ये मनोहरराव नाईक तर उमरखेडमध्ये राजेंद्र नजरधने यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्याच ठिकाणी काँग्रेसचे नेते व माजी आमदारही जोर लावून आहेत. आर्णी, उमरखेड व वणीच्या आमदारांचा नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने अनुभव व पक्ष बांधणी, संघटन कमी पडत असल्याचे राजकीय गोटात मानले जाते. पुसदमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाजपावासी झाल्याने राष्ट्रवादीला काही प्रमाणात का होईना फटका बसण्याची शक्यता आहे. नगरसेवक एक-दोन कमी आले तरी चालतील पण नगराध्यक्ष आपल्याच पक्षाचा हवा या दृष्टीने सर्वच प्रमुख नेत्यांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)