बिमारी रे बिमारी...कोरोना बिमारी..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:01:04+5:30
मंगळवारी पोळ्याचा सण आहे, पण पोळ्यात गुढी फिरणार नाही. कारण कोरोनाच्या भीतीमुळे पोळ्यावर बंदी आली. कृषी संस्कृतीत भीतीला थारा नसतो. केवळ समाजाजिक जबाबदारी ओळखून गावकऱ्यांनीही पोळा न भरविण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनात भरून आलेल्या भावनांना वाट करून देणाऱ्या झडत्या झरल्याच...

बिमारी रे बिमारी...कोरोना बिमारी..!
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
बिमारी रे बिमारी
कोरोना बिमारी
या बिमारीचा
असा आणा खंबा
लॉकडाऊनने झाला हो
पुरा व्यापार उदीम लंबा
एक नमन गौरा पार्वती हरबरा.. हर हर महादेव
पोळा भरणार नसला, तरी पोळ्याचा झडत्यांना उतार पडणे शक्य नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनावर तिरंदाजी करणाऱ्या इरसाल झडत्या हौशी मंडळींनी तयार ठेवल्या आहे.
बदललेल्या पोळ्याच्या माहौलमध्ये झडत्यांची ढबही बदलून गेली आहे. आजवर सरकारच्या धोरणांवर, गावपुढाऱ्यांच्या बनवेगिरीवर वार करणाऱ्या झडत्या पोळा दणाणून सोडायच्या. यंदा शेतकऱ्यांच्या भात्यात पाजवून तयार असलेल्या झडत्या कोरोनावर शरसंधान साधण्यासाठी ‘रेडी’ आहेत.
मंगळवारी पोळ्याचा सण आहे, पण पोळ्यात गुढी फिरणार नाही. कारण कोरोनाच्या भीतीमुळे पोळ्यावर बंदी आली. कृषी संस्कृतीत भीतीला थारा नसतो. केवळ समाजाजिक जबाबदारी ओळखून गावकऱ्यांनीही पोळा न भरविण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनात भरून आलेल्या भावनांना वाट करून देणाऱ्या झडत्या झरल्याच...
अक्कल रे अक्कल
शिकलेल्यांची अक्कल
या अक्कल नं पडलं हो
आमाले टक्कल
ज्यानं कवा नायी पायला
वावराचा धुरा
तोही आमाले म्हंते
शेतात नवा प्रयोग करा
एक नमन गौरा पार्वती हरबरा.. हर हर महादेव
आर्णी तालुक्यातील जवळा येथील अ. भा. ठाकूर यांनी तयार केलेल्या अशा झडत्या शेतकऱ्यांना ‘अक्कल शिकविणाºयां’ची फिरकी घेणार आहे.
दुरून बोल जवय नको
करुणाचं भय
अंतर ठेव शरीरात
मनात नको सय
भले राहू अलग अलग
मनानं राहू एक
करून नियमाचं पालन
करोना हरवू थेट
एक नमन गौरा पार्वती हरबरा.. हर हर महादेव
एकीकडे कोरोनावर हल्लाबोल करतानाच कोरोनापासून बचावाचे उपायही झडत्यांमधून झळकणार आहेत. पोळा भरणार नसला तरी, शेतकरी आपल्या बैलजोड्या सजविणार आहेत. त्यांची पूजा करणार आहेत. वर्षभर मेहनतीने साथ देणाऱ्या वृषभ राजाचा यथोचित सन्मान करणारा आहे.
आपल्या घराच्या अंगणात आपल्या बैलजोडीची आरती करताना कदाचित उर दाटून येईल...