कापूस उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:00:02+5:30
मागील आठवड्यात राळेगाव येथील चार कापूस व्यापाºयांनी आपापल्या जिनिंगमध्ये चार हजार ७०० ते चार हजार ८०० रुपये दराने चांगल्या प्रतीचा एफएक्यू कापूस खरेदी केला. फेअर, फरतड, झोडा मालाच्या प्रतवारीप्रमाणे त्यापेक्षा कमी दरात खरेदी करण्यात आला. राळेगाव तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातून व जिल्ह्यातूनही येथे कापूस विक्रीस आला.

कापूस उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान
के.एस. वर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : प्रथम २१ एप्रिल व त्यानंतर २७ एप्रिल रोजी सीसीआयची कापूस खरेदी सुरू होईल, अशी घोषणा संबंधितांद्वारे करण्यात आली होती. या दोनही तारखांना शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी सुरू झालेली नाही. ती आता कधी सुरू होईल हे सांगण्यास कोणीही तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आपला कापूस खासगीत विकावा लागण्याची पाळी आली आहे. यात राळेगाव तालुक्यातील दोन हजार १०० शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.
२१ ते २४ एप्रिल या काळात राळेगाव केंद्रावर एक हजार ४७७, खैरी केंद्रावर ६१२ याप्रमाणे दोन हजार ८९ शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री करण्याकरिता नोंदणी केलेली आहे. दीड महिन्यांपासून बंद असलेली कापूस खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत हे शेतकरी आहेत.
मागील आठवड्यात राळेगाव येथील चार कापूस व्यापाºयांनी आपापल्या जिनिंगमध्ये चार हजार ७०० ते चार हजार ८०० रुपये दराने चांगल्या प्रतीचा एफएक्यू कापूस खरेदी केला. फेअर, फरतड, झोडा मालाच्या प्रतवारीप्रमाणे त्यापेक्षा कमी दरात खरेदी करण्यात आला. राळेगाव तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातून व जिल्ह्यातूनही येथे कापूस विक्रीस आला.
या आठवड्यात दररोज पाच हजार क्विंटलची आवक राहिली होती. आता या आठवड्यात परत खासगी खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. मजुरांची अडचण, गठाणीला मागणी नाही, नवे-जुने पेमेंट मिळण्यातील अडचणी आदी बाबींच्या समस्यांचा व्यापाºयांनाही सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांना यावेळी पैशांची नितांत गरज आहे. कडक उन्हाचा तडाखा सुरू झाला आहे. त्यामुळे आगीचा धोका आहे. त्यांचे अनेक व्यवहार थांबले आहे. समोर हंगाम आलेला आहे. त्वरित पैसे मिळण्याकरिता कापूस विक्री होणे आवश्यक आहे. शेतकºयांपुढे अनेक अडचणी असल्याने यादृष्टीने प्रयत्न आवश्यक आहे.
शासन व प्रशासनाची कसोटी
सीसीआयच्या कापूस खरेदीकरिता मंत्रालयातून आदेश निघाले. पालकमंत्री, जिल्हाधिकाºयांनी बैठक घेऊन निर्देश दिले. शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत ंसबंधितांकडून आदेश काढून घेतले. याचाही उपयोग न झाल्याने त्यांनी आत्मक्लेषचा मार्ग अवलंबिला. आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत शेतकऱ्यांची ही ज्वलंत समस्या मांडली तरी शेतकरी बांधवांना दिलासा मिळालेला नाही. संचारबंदी काळात इतर घटकांना मदतीचा हात मिळाला असताना, बळीराजाला सर्वच यंत्रणा अनुकूल असताना लाभ मिळालेला नाही. कोट्यवधींच्या नुकसानीचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.
जिनिंग प्रेसिंग संचालक सीसीआयद्वारे सुचविण्यात आलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांची जिनिंग सीसीआयकरिता देण्यास तयार नाही. त्यामुळे खरेदी सुरू होऊ शकली नाही.
- उमेश दाभेराव,
खरेदी प्रतिनिधी, सीसीआय राळेगाव