भाविकांचे श्रद्धास्थान कमळजापूरची भवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:33+5:30
नऊ किलोमीटर अंतरावरील राणीअमरावती गावाच्या पुढे कमळजापूर येथे नदी काठावर असलेल्या कमळजाई भवानीमाता हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्र उत्सवात याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. मनोकामना पूर्ण करणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे.

भाविकांचे श्रद्धास्थान कमळजापूरची भवानी
आरिफ अली ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : येथून नऊ किलोमीटर अंतरावरील राणीअमरावती गावाच्या पुढे कमळजापूर येथे नदी काठावर असलेल्या कमळजाई भवानीमाता हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्र उत्सवात याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. मनोकामना पूर्ण करणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे.
बाभूळगाव तालुक्याच्या नकाशावर उजाड गाव म्हणून नोंद असलेल्या कमळजापूर गावातील या मंदिरालगत उत्तरवाहिनी वेरूळा नदी वाहते. यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. प्राचीन काळातील या ऐश्वर्यसंपन्न नगरीत त्यावेळी कृष्णवर्णीय गवळी लोकांची वस्ती होती, असे सांगितले जाते.
भवानीमाता मंदिराच्या खाली असलेल्या गोमुखातून बारमाही पाण्याची अखंड धार वाहते. गोमुखातील हे पाणी वेरूळा नदीत पडते. नदी आटली तरी गोमुखातील पाण्याची धार थांबत नाही, हा मोठा चमत्कार मानला जातो. हजारो भाविक येथे दर्शनासाठी दूर वरून येतात. नवरात्रात दरवर्षी येथे नामवंत कलावंतांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम घेतला जातो. यावर्षी ७ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता भक्ती संगीत होत असल्याची माहिती कमळजाई भवानी संस्थानतर्फे दिली. नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांसाठी भाविक पुढाकार घेत आहे.
‘ब’ दर्जा प्राप्त देवस्थान
तीर्थक्षेत्र कमळजाई भवानी मंदिराला शासनातर्फे ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. एक कोटी ५३ लाख ३६ हजार रुपयांचा निधी या मंदिरासाठी अलिकडे मिळाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निधीतून पुरुष भक्त निवासाकरिता ५१ लाख रुपये, महिला भक्त निवासासाठी ५० लाख तर वॉल कंपाऊंडकरिता २२ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. मंदिराचे काम पाहणाऱ्या कमिटीमध्ये आजूबाजूच्या गावातील भक्तांची निवड करण्यात आली आहे. हे सर्वजण एक दिलाने भक्तीभावाने काम पाहतात.