भांबराजाच्या महिलेचे अपहरण करून खून ?
By Admin | Updated: June 7, 2017 00:59 IST2017-06-07T00:59:39+5:302017-06-07T00:59:39+5:30
महिलेचे अपहरण करून खून करण्यात आल्याच्या शक्यतेतील संशयित आरोपीला यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

भांबराजाच्या महिलेचे अपहरण करून खून ?
नऊ महिन्यानंतर तक्रार : संशयित अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महिलेचे अपहरण करून खून करण्यात आल्याच्या शक्यतेतील संशयित आरोपीला यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असली तरी अद्याप मृतदेहाची खात्री पटली नसल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही. उल्लेखनीय म्हणजे सदर महिला बेपत्ता झाल्यानंतर जवळपास नऊ महिन्यांनी पोलिसात तक्रार देण्यात आली.
सुनंदा विजय वरठी रा. भांबराजा या महिलेने तीन दिवसांपूर्वी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देऊन माझी बहीण दुर्गा राजेंद्र भोपले (३४) ही २ आॅगस्ट २०१६ पासून घरून बेपत्ता असून तिचे अपहरण करून खून झाल्याची शक्यता तक्रारीत व्यक्त केली. गावातीलच वैभव यशवंत जगताप (२२) यानेच अपहरण व खून केला असू शकतो, असेही सांगितले. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून ग्रामीण पोलिसांनी वैभव जगताप याला ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेतली. परंतु नंतर यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार महिपालसिंह चांदा यांनी आरोपी वैभवला विश्वासात घेऊन व आपले वेगळे स्किल वापरून त्याला बोलते केले. यावेळी वैभवने ठाणेदारांना दिलेल्या माहितीनुसार दुर्गा भोपले या महिलेला २ आॅगस्ट २०१६ रोजी तो सोबत घेऊन कळंबला आणि नंतर वर्धा नदीवर गेला. तेथे पुलावरून तिला ढकलून दिल्याचे कबूल केले.
‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली नाही
१६ आॅगस्ट २०१६ रोजी मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. त्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. तो मृतदेह दुर्गाचाच होता का, या दिशेने आता ग्रामीण पोलीस तपास करीत आहे. वैभव जगताप याने दुर्गाचे अपहरण करून तिचा खून करण्याचा प्रयत्न का केला, हे सुद्धा सध्या गुलदस्त्यात आहे. या प्रकरणाचा तपास ग्रामीणचे ठाणेदार महिपालसिंह चांदा हे करीत आहेत.