मानकर, पुरके आणि उईके गटही खूश
By Admin | Updated: July 6, 2016 02:51 IST2016-07-06T02:51:05+5:302016-07-06T02:51:05+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालाने तिनही गट खूश असल्याचे दिसून येत आहे. या मागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहे.

मानकर, पुरके आणि उईके गटही खूश
राळेगाव बाजार समिती : भविष्यातील राजकीय समिकरणे
के.एस. वर्मा राळेगाव
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालाने तिनही गट खूश असल्याचे दिसून येत आहे. या मागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहे. भविष्यातील घडामोडी आणि समिकरणांच्यादृष्टीने बाजार समितीच्या निकालाकडे पाहिले जात आहे.
या संस्थेवर अॅड. प्रफुल्ल मानकर गटाने १८ पैकी १४ जागा जिंकून सत्ता पुन्हा ताब्यात ठेवली. प्रा. वसंत पुरके गटाने ग्रामपंचायतीच्या केवळ चार जागा जिंकून विरोधी पक्षाचे स्थान प्राप्त केले. आमदार प्रा.डॉ. अशोक उईके गटाला एकही जागा मिळाली नसली तरी हा गट खूश आहे.
मानकर गटाने पुरके गटाला सहा जागा निवडणुकीपूर्वी तडजोडीत देऊ केल्या होत्या. संचालकापेक्षा कोणतेच अधिकचे जादा अधिकार नसतानाही उपसभापतीपद देण्यावरून झालेली बोलणी त्यावेळी फिसकटली, तशी ती व्हावी अशी दोनही गटाची त्यावेळी इच्छा नव्हती. त्या स्थितीत लागलेले निकाल सर्वांना खूश करीत असल्याचे वेगळेच आश्चर्य या समिकरणामुळे समोर आले आहे.
सत्ता राहिली, सभापती, उपसभापती आपल्या गटाचे होणार म्हणून मानकर गटाची खूशी समजता येऊ शकते. पण, चार जागा जिंकूनही पुरके गट खूश राहण्याचे कारण मानकर गटाची साथ सुटल्याने आता पुढील निवडणुकात होणारी ढवळाढवळ थांबून काँग्रेस नेत्यांना आपल्या मनमर्जीप्रमाणे या निवडणुकीत कार्यकर्त्यांना तिकीटा देता येणे शक्य होणार असल्याचे कारण आहे.
आमदार उईके गटाला खाते उघडता आले नसले तरी भविष्यात पुरके व मानकर गटात या निवडणुकीत निर्माण झालेले वैषम्य आणि भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीतील चिवट झुंजीत भाजपला मतविभाजनाचा फायदा मिळण्याची संधी-शक्यतेमुळे हा गट आतून आनंदी झाला आहे.
येत्या सहा महिन्यात वसंत सहकारी जिनिंग, सहकारी मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक मते मिळाली असल्याने आणि त्यामुळे चार जागा प्राप्त करता आल्या असल्याने पुरके गट आनंदी झाला. असे असले तरी वेळेवर होणारी नवी समिकरणे आणि योग्य उमेदवारांची निवड यावरही जय-पराजय अवलंबून राहणार आहे.
मानकर गटाने सोसायट्यांवर फार आधीपासूनच लक्ष पुरविले होते. बँक संचालकपदाचा फायदा त्यांना मिळाला. पुरके गट नेहमीप्रमाणे मानकर गटावर विसंबून राहिल्यानेही पराभव स्वीकारावा लागला. जय-पराजयाचे अंतर कमी राहिल्याने ही चूक आता ध्यानात आली असून बँक व इतर निवडणुकीकरिता कार्यकर्त्यांना चार्जिंग करणे सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वर्षे फिरून आल्यावरही प्रफुल्ल मानकरांना पुर्वीचे तालुक्यात फ्री हँडचे स्वातंत्र्य अपेक्षित होते. पण, गत काही वर्षात अनेक झटके प्रा. पुरके यांना बसल्याने आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मानकरांची साथ सोडली. तालुक्यात आता दरवेळी यातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.