शेतकर्यांसाठी व्यापारी ठरले कर्दनकाळ
By Admin | Updated: June 4, 2014 00:23 IST2014-06-04T00:23:25+5:302014-06-04T00:23:25+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात व्यापारीच शेतकर्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. ते कुठेही शेतमाल खेरदी करीत असल्याने शेतकर्यांची पिळवणूक होत आहे. मात्र बाजार समितीचे त्याकडे

शेतकर्यांसाठी व्यापारी ठरले कर्दनकाळ
बाजार समितीचे दुर्लक्ष : शेतकर्यांना माहितीही मिळत नाही
नीलेश यमसनवार - पाटणबोरी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात व्यापारीच शेतकर्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. ते कुठेही शेतमाल खेरदी करीत असल्याने शेतकर्यांची पिळवणूक होत आहे. मात्र बाजार समितीचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
येथील उपबाजारात शेड आणि ओट्यांची वानवा आहे. आत्तापर्यंत येथे शेड आणि ओटे बांधण्यात न आल्याने शेतकर्यांना आपला शेतमाल कुठे ठेवावा, असा प्रश्न पडतो. सोबतच शेतमालाच्या दरातील चढ-उतार कळत नसल्याने शेतकर्यांची नाडवणूक होत आहे. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी करंजी, रूंझा, मोहदा आदी ठिकाणी दोन-दोन शेड, ओटे बांधण्यात आले. मात्र लोकसंख्येने तालुक्यात सर्वात मोठे असलेल्या पाटणबोरी येथील उपबाजार समितीत शेड व ओटे आतापर्यंत बांधण्यात आले नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाला येथील उपबाजाराचा विसर पडल्याचे दिसून येते.
येथे शेतकर्यांना शेतमालाबाबत कोणतीही माहिती विचारायची झाल्यास स्वतंत्र कक्ष नाही. बाजार समितीचा कर्मचारी नाही. कोणत्याही शेतमालाच्या भावात चढ-उतार झाल्यास शेतकर्यांना त्याची माहिती मिळत नाही. परिणामी शेतकर्यांचे नुकसान होते. त्यांना आंधळेपणाने आपला शेतमाल व्यापार्यांच्या घशात घालावा लागतो. व्यापारी बाजार समितीच्या प्रांगणात शेतमालाची खरेदी न करता आपल्या सोयीच्या ठिकाणी करतात. त्यातून शेतकरी नागवला जात आहे.
व्यापारीच शेतमालाचा दर ठरवितात. छोट्या शेतकर्यांना ते परवडत नाही. मात्र त्यांना आपला शेतमाल दुसरीकडे विकण्यासाठी नेणेही परवडत नाही. त्यामुळे अखेर व्यापारी म्हणेल, त्या भावात त्यांना आपला शेतमाल नाईलाजाने त्यांच्या घशात घालावा लागतो. यात त्यांचे आर्थिक नुकसान होते. मोठे शेतकरी व्यापार्यांच्या या धोरणाला कंटाळून आता शेतमाल पाटणबोरीऐवजी पांढरकवडा, हिंगणघाट, आदिलाबाद येथील बाजारपेठेत नेत आहे. त्यामुळे बाजार समितीचे ‘सेस’चेही प्रचंड नुकसान होत आहे.