धामणगाव रोडवरील चौकांचे सौंदर्यीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:44 IST2019-04-29T21:44:12+5:302019-04-29T21:44:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : यवतमाळ शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ५० कोटींचा धामणगाव मार्ग चौपदरी झाला असून त्याचे संपूर्ण ...

धामणगाव रोडवरील चौकांचे सौंदर्यीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ५० कोटींचा धामणगाव मार्ग चौपदरी झाला असून त्याचे संपूर्ण कामही पूर्ण झाले आहे. आता या मार्गावर दोन ठिकाणी चौकांचे सौंदर्यीकरण करून त्यात भर घातली जाणार आहे.
केंद्रीय रस्ते निधीतून धामणगाव रोडसाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून पोस्ट आॅफीस चौक ते करळगाव घाटाच्या पुढे दोन किलोमीटर असा दहा किलोमीटरचा चौपदरी मार्ग बांधण्यात आला. या चौपदरी मार्गाच्या दोन्ही बाजूने भूमिगत नाल्या आहेत. रस्त्याच्या मधात डिव्हायडर असून त्यावर गार्डन तयार करण्यात येत आहे. रस्त्याच्या बाजूला तीन हजार झाडे लावण्यात आली आहे. या मार्गावर डिव्हायडरमध्ये पथदिवे लावण्यात आल्याने रात्रीला या मार्गाला झळाळी प्राप्त झाली आहे. संपूर्ण डांबरीकरण करून काम पूर्ण झाल्याने या मार्गाचे सौंदर्य वाढले आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. या मार्गावरील जुनी घरे पाडून नागरिक आता तेथे शॉपिंग कॉम्प्लेक्स व फ्लॅट सिस्टीम उभारताना दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले धामणगाव रोड चौपदरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
पोस्ट आॅफीस चौकात योगा करणाऱ्या व्यक्तीचा पुतळा उभारुन योगाभ्यासाचा संदेश दिला जाणार आहे. तर कॉटन मार्केट चौकात सातत्याने शेतकऱ्यांची वर्दळ राहत असल्याने या चौकामध्ये बैलगाडीवरील शेतकºयाचा पुतळा साकारला जाणार आहे. रस्त्याच्या एका बाजूला या पुतळ्यासह सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी दिली.
पालकमंत्र्यांनी दिला विकास निधी
या सुंदर चौपदरी मार्गाला आणखी सौंदर्य प्राप्त व्हावे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी खनिज विकास निधीतून लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून कॉटन मार्केट चौक व पोस्ट आॅफीस चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.