सावधान ! तुमची मुलेही असू शकतात दहशतीत

By Admin | Updated: November 29, 2014 02:13 IST2014-11-29T02:13:17+5:302014-11-29T02:13:17+5:30

मुलांची घरात होणारी चिडचीड. मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम गायब होणे. कुणाच्या तरी दबावात असल्यासारखी वर्तणूक आपल्या घरातील ...

Be careful! Your children may also be scared | सावधान ! तुमची मुलेही असू शकतात दहशतीत

सावधान ! तुमची मुलेही असू शकतात दहशतीत

सुरेंद्र राऊत यवतमाळ
मुलांची घरात होणारी चिडचीड. मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम गायब होणे. कुणाच्या तरी दबावात असल्यासारखी वर्तणूक आपल्या घरातील शाळकरी मुलगा करीत असेल तर पालकांनो सावधान. शहरात गेल्या काही दिवसांपासून शाळकरी विद्यार्थ्यांना हेरुन खंडणी उकळण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. अशी डझनावर प्रकरणे उघडकीस येऊनही केवळ कुटुंबाची प्रतिष्ठा वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून पोलिसांपर्यंत पोहोचली नाहीत. यातूनच खंडणी उकळणाऱ्यांचे मनोबल आणि संख्या वाढतच चालली आहे.
चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आदींचा पगडा किशोरवयीन मुलांवर असतो. शाळा आणि घरी वावरतानाही त्यांच्या कृतीतून त्याचा परिणाम दिसतो. गुन्हेगारी वर्तूळातील लोकांचे राहणीमान, महागड्या गाड्या, गळ्यातील सोनसाखळी, वाघ नखे, ब्रासलेट, अंगठ्या, बोलण्याची पद्धत अन् त्यांच्या भोवतीचा गोतावळा या किशोरवयीन मुलांना नेहमी आकर्षित करीत असतात. यातूनच ही मुले त्यांच्या थेट संपर्कात येण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांच्याशी ओळख निर्माण करतात. यातूनच सुरू होतो मग खंडणी वसुलीचा प्रवास.
पालकांचे दुर्लक्ष कारणीभूत
अनेकदा पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळत नसतो. दोघेही नोकरी किंवा व्यवसायानिमित्त घराबाहेर असतात. अशा परिस्थितीत पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होते. ही मुले एकलकोंडी होऊन दूरचित्र वाहिन्यांकडे आकर्षित होतात. नंतर ही मुले वाईट मित्रांच्या संगतीत रमतात. त्यातून या मुलांना त्यांच्यापेक्षा मोठी मुले वाईट सवई लावतात. यासाठी घरुन पैसे आणण्यास भाग पाडतात.
यवतमाळ शहरात गेल्या काही महिन्यात असे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले. काही दिवसांपूर्वी दारव्हा नाका परिसरात असे काही प्रकार घडल्याने पालकवर्ग सावध झाला होता. मात्र आता पुन्हा ही टोळी सक्रीय झाली.
पोलिसांचा कानाडोळा
शहरात शाळकरी मुलांना खंडणी मागण्याचे प्रकार उघडकीस येत आहे. काही पालक पोलीस ठाण्यातही पोहोचत आहे. मात्र पोलीस या प्रकाराला गांभीर्याने पहायलाच तयार नाही. मुलकी येथील एक महिला आपल्या मुलावरील अन्यायासाठी पोलीस अधीक्षकांपर्यंत जाऊन आली. परंतु तिचे गाऱ्हाणे कुणी ऐकून घेतले नाही. कारवाई होत नसल्याने अशा टारगट मुलांचे मनोबल वाढत जाते.
अशी आहे ‘मोडस आॅपरेंडी’
शाळेतीलच नऊ-दहा वर्गाचे विद्यार्थी पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांना हेरतात. अनेकदा सुरुवातीला एकच विद्यार्थी लहान विद्यार्थ्याला हेरतो. त्याच्यावर नाश्ता, चॉकलेट, गिफ्ट, मोबाईल, आकर्षक पेन या माध्यमातून खर्च केला जातो. नंतर हळूहळू या विद्यार्थ्याला घरुन वडिलांच्या खिशातून-पाकिटातून, आईच्या पर्समधून, कपाटातून १००-२०० रुपये आणायला सांगितले जाते. रक्कम कमी असल्याने घरच्यांच्याही ही बाब लक्षात येत नाही. परंतु पाहता पाहता हा आकडा वाढत जाऊन हजारो रुपयांच्या घरात पोहोचतो. सुरुवातीला शाळेतील एकच सिनिअर विद्यार्थी या साखळीत असतो. मात्र नंतर त्याचे काही बाहेरील मित्र त्यात सहभागी होतात. बाहेरील हा मित्र परिवार टपोरी, गुन्हेगारी वर्तुळात अप्रत्यक्ष वावरणारा असतो. एखाद्या विद्यार्थ्याने पैसे आणण्यास नकार दिल्यास त्याला तुझे यापूर्वीचे कारनामे तुझ्या घरी सांगतो, असा दम भरला जातो. तरीही विद्यार्थी मानत नसेल तर त्याला थेट चाकू, रिव्हॉल्वर या सारख्या शस्त्राचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची, अपहरण करून विकण्याची धमकी दिली जाते. या ब्लॅकमेलिंगमुळे अनेक विद्यार्थी ही टोळी सांगेल त्या पद्धतीने मुकाट्याने अंमलबजावणी करीत राहते. शिकार झालेले हे विद्यार्थी प्रचंड तणावात असतात. मात्र एक तर कुटुंबियांना त्याची कल्पना येऊ देत नाही किंवा घरच्यांनी विचारले तरी ते फुटत नाहीत. असे अनेक विद्यार्थी या टोळक्याचे शिकार होऊन दहशतीत वावरत असण्याची शक्यता आहे.

Web Title: Be careful! Your children may also be scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.