आयुष्याच्या सायंकाळी निराधार जनाबाईला मंदिराचा आधार
By Admin | Updated: January 3, 2015 02:10 IST2015-01-03T02:10:02+5:302015-01-03T02:10:02+5:30
वय वर्ष ७०. मागे पुढे कुणीच नाही. रहायला घरही नाही. शासनाच्या निराधाराचे पैसेही वेळेवर येत नाही. अशा स्थितीत आयुष्याच्या सायंकाळी जगण्याचा संघर्ष सुरू आहे.

आयुष्याच्या सायंकाळी निराधार जनाबाईला मंदिराचा आधार
उत्तम चिंचोळकर गुंज
वय वर्ष ७०. मागे पुढे कुणीच नाही. रहायला घरही नाही. शासनाच्या निराधाराचे पैसेही वेळेवर येत नाही. अशा स्थितीत आयुष्याच्या सायंकाळी जगण्याचा संघर्ष सुरू आहे. दिवस कुठे तरी काढायचा आणि रात्री विठ्ठलाच्या मंदिरात पथारी पसरायची, असा तिचा दिनक्रम. वर्षभरापासून निराधारचे मानधनच आले नाही. त्यामुळे गुंजच्या जनाबाई अडकिने या महिलेवर उपासमारीची वेळ आली आहे.
महागाव तालुक्यातील गुंज येथे जनाबाई अडकिने ही वृद्धा राहते. तिला जवळचे कुणीही नातेवाईक नाही. घर ना शेत अशी तिची अवस्था आहे. मोलमजुरी करून ती जगत होती. मात्र आता शरीर साथ देत नाही. कोणतेही काम होत नाही. अशा स्थितीत तिला शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा आधार मिळाला. त्यातून आपला उदरनिर्वाह करू लागली. मात्र गेल्या वर्षभरापासून जनाबाईला मानधनच आले नाही. त्यामुळे तिच्यावर उपासमारीची वेळ आली. निराधार योजनेचे पैसे आले का हो, असे म्हणत, तहसील आणि बँकांचे उंबरठे झिजविते. मात्र कुणीही तिला दाद देत नाही. पैसेच नसल्याने तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दोन वेळचे जेवणही राहायला घर नसल्याने ती रात्री गावातील विठ्ठल मंदिराचा आश्रय घेते. महागाव तालुक्यात जनाबाईसारख्या अनेक वृद्ध महिला आहे. ज्यांचा उदरनिर्वाहच केवळ निराधार योजनेच्या मानधनावर होतो. परंतु शासनाच्या लालफितीत अडकलेले प्रशासन त्यांना मदतीपासून दूर ठेवते. विशेष म्हणजे महागाव तालुक्यात निराधारांसाठी मोठे आंदोलनही छेडण्यात आले होते. मोर्चा काढून आपला रोषही या निराधारांनी व्यक्त केला होता. परंतु अद्यापही अनेक गरजवंतांना निराधारचे मानधन मिळाले नाही.
जनाबाईही त्यातील एक. दररोज ती मोठ्या आशेने आज तरी पैसे येईल आणि उधार घेतलेले लोकांचे पैसे देता येईल, अशी प्रतीक्षा करीत असते.