बानू आणि जाखीरचा विवाह ठरला हृदयस्पर्शी

By Admin | Updated: October 3, 2016 00:18 IST2016-10-03T00:18:17+5:302016-10-03T00:18:17+5:30

‘हा धर्म माझा, जात माझी, पंथ माझा का करी, हे विश्वची आपुले म्हणूनी का न म्हणसी बोलना?’,

Banu and Jakhir's marriage are heartening | बानू आणि जाखीरचा विवाह ठरला हृदयस्पर्शी

बानू आणि जाखीरचा विवाह ठरला हृदयस्पर्शी

तिथे तुटतात जातीधर्माचे बंधन : हिंदू भावाच्या मदतीने मुस्लीम भगिनीचा विवाह
यवतमाळ : ‘हा धर्म माझा, जात माझी, पंथ माझा का करी, हे विश्वची आपुले म्हणूनी का न म्हणसी बोलना?’, असा परखड सवाल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल मानव जातीला केला होता. एकच जात ती मानवतेची, एकच धर्म पे्रमाचा, एकच नातं मातीच,ं असा उपदेश सत्यसाईबाबांनी केला. हा संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य यवतमाळात पार पडले.
निमित्त होते, पित्याची छत्रछाया हरविलेल्या बानू या धर्माने मुस्लिम असलेल्या मुलीच्या विवाह सोहळयाचे. डॉ.प्रकाश नंदूरकर यांनी मानवता धर्माचे पालन करीत मानसकन्या बानूचा विवाह रविवारी पार पाडला. नंदुरकर विद्यालयाच्या रंजन सभागृहात झालेला हा सोहळा अनुभवण्यासोबत बानू आणि जाकीरला आशीर्वाद देण्यासाठी सर्वच जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यवतमाळ येथील रविदासनगरात वास्तव्याला असणारी बानू गफार शेख ही मुलगी तीन वर्षांची असताना तिच्यावरील पित्याचे छत्र हरपले. त्यावेळी तिची छोटी बहीण केवळ दीड वर्षांची होती. यावेळी बानुच्या आईने कापूस संकलन केंद्रात रोजमजुरी करून आणि प्लास्टिक विकून दोन पैसे गोळा केले. अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाडा हाकलून मुलींना मोठे केले. अशावेळी डॉ. प्रकाश नंदूरकर भाऊ म्हणून बानूच्या पाठीशी उभे राहीले. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करणाऱ्या बानूला शासकीय रुग्णालयात नोकरी मिळाली. रूई (वाई) येथील जाखीर खान या युवकाशी तिचा विवाह झाला. जाखीर हा सुद्धा कठीण परिस्थितीवर मात करीत पुढे आला आहे.
रविवारी मुस्लीम समाजाच्या रितीरिवाजानुसार बानू आणि जाखीरचा विवाह पार पडला. या सोहळ्याला पालकमंत्री संजय राठोड, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, हाफीज इब्राहिम साहाब, हाफीज मुमताज खान साहाब, साक्षीदार म्हणून रूई येथील लायक अली काजी, हाफीज अली काजी यांची उपस्थिती होती.
यवतमाळ येथील आनंद कसंबे यांनी बानू यांचा संघर्षमय जीवनपट यावेळी चित्रफितीद्वारे मांडला. प्रास्ताविक डॉ. प्रकाश नंदूरकर यांनी तर संचालन जयंत चावरे यांनी केले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)

जाखीरला नोकरी आणि व्यवसायाची आॅफर
संघर्षात जीवन जगणाऱ्या बानूची निवड करणारा जाखीरही कष्टकरी आहे. या विवाह सोहळ्याप्रसंगी बुलडाणा अर्बन बँकेने जाकीरला नोकरी देण्याची घोषणा केली. तर राज्यमंत्री मदन येरावार यांनी त्याला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी मूद्रा लोन देण्याचे आश्वासन दिले.
राहुलच्या आवाजाने सारेच मंत्रमुग्ध
या विवाह सोहळ्यासाठी संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत रजनीला संगीत देणारा राहुल सातव दोनही डोळयाने अंध आहे. मात्र त्याच्या आवाजाने सर्वांनाच यावेळी भुरळ पाडली. त्याच्या गायनाने सर्वाधिक टाळ्या मिळविल्या.

मानवता धर्म हा खरा धर्म आहे. या धर्माचे पालन केल्याने खरी सद्भावना निर्माण होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारला जाईल. सद्भावनेतून अनेक प्रश्न सुटतील. यासाठी सर्वांनी जाती धर्माचे बंधन तोडून देशहितासाठी काम करावे.
- मदन येरावार, राज्यमंत्री

हा विवाह सोहळा समाजाला नवी प्रेरणा देणारा ठरणारा आहे. सर्वांनी अशावेळी जात, पात, धर्म बाजूला सारून माणुसकी जपण्याची आवश्यकता आहे.
- संजय राठोड, पालकमंत्री

Web Title: Banu and Jakhir's marriage are heartening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.