पैसे काढण्यासाठी पुसदमध्ये बँका हाऊसफुल्ल
By Admin | Updated: November 16, 2016 00:32 IST2016-11-16T00:32:33+5:302016-11-16T00:32:33+5:30
शासनाने पाचशे व हजारांच्या नोटा रद्द करण्याचा ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून निर्णय घेऊन तब्बल आठ दिवस उलटले तरी

पैसे काढण्यासाठी पुसदमध्ये बँका हाऊसफुल्ल
नोटांचा तुटवडा : एटीएममध्येही ग्राहकांच्या लांबचलांब रांगा
पुसद : शासनाने पाचशे व हजारांच्या नोटा रद्द करण्याचा ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून निर्णय घेऊन तब्बल आठ दिवस उलटले तरी अद्यापही पुसदमधील सर्वच बँकांमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी दिसून येत आहे.
सोमवार १४ नोव्हेंबर रोजी गुरूनानक जयंतीनिमित्त बँकांना सुटी होती. मंगळवारी बँका उघडल्यानंतर ग्राहकांनी डिपॉझिट, विड्रॉल व जुन्या नोटा बदलण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. त्यामुळे बँकासह एटीएमसमोरही नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बँकांमध्ये २०, ५०, १००, ५०० व २००० रुपयांच्या नोटांचा तुटवडा असल्याने अनेक शाखांमध्ये विड्रॉलची मर्यादा कमी करण्यात आली. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शहर शाखेने तर केवळ एक हजाराचा विड्रॉल देण्यात येत आहे. तर स्टेट बँकेच्या शाखेत प्रवेशासाठी एकच रांग व विड्रॉल, डिपॉझीट, एक्स्चेंजसाठी वेगळे काऊंटर नसल्याने एकच गोंधळ उडाला. पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने जुन्या नोटा एक्स्चेंज करण्यासाठी व नवीन चलन घेण्यासाठी नागरिकांनी शहरातील भारतीय स्टेट बँक, पुसद अर्बन बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, युनीयन बँक आदी ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. आठव्या दिवशीही ग्राहकांनी बँकांसह एटीएमसमोरही लांबच लांब रांगा लावल्या. नागरिकांना तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र सर्वदूर पाहावयास मिळाले. येथील स्टेट बँकेच्या शाखेत ग्राहकांसाठी वेगवेगळे काऊंटर नसल्याची नागरिकांची ओरड संताप पाहायला मिळाला. (प्रतिनिधी)