बॅग-चेन लिफ्टर पुन्हा सक्रिय

By Admin | Updated: December 14, 2015 02:27 IST2015-12-14T02:27:37+5:302015-12-14T02:27:37+5:30

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्याची पर्स शुक्रवारी सायंकाळी यवतमाळच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून लंपास करण्यात आली.

Bags-chain lifters reactivated | बॅग-चेन लिफ्टर पुन्हा सक्रिय

बॅग-चेन लिफ्टर पुन्हा सक्रिय

विविध टोळ्या : आरटीओ कर्मचाऱ्याची पर्स लंपास, म्होरक्याचा शोध घेण्यात अपयश
यवतमाळ : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्याची पर्स शुक्रवारी सायंकाळी यवतमाळच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून लंपास करण्यात आली. या घटनेमुळे बसस्थानकावर बॅग लिफ्टर, चेन लिफ्टर व खिसेकापू पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येते.
सदर महिला कर्मचारी बसस्थानकावर एसटीच्या प्रतीक्षेत असताना हातात भलीमोठी बॅग घेवून असलेल्या एका महिलेने त्यांना धक्का दिला. लगेच ‘सॉरी’ही म्हटले. त्यानंतर सदर महिला कर्मचारी हैदराबाद-अमरावती या बसमध्ये बसल्या असता त्यांना आपली पर्स बेपत्ता असल्याचे आढळून आले. धक्का देणाऱ्या सदर महिलेनेच ही पर्स लंपास केल्याचा त्यांचा संशय आहे. पर्स लंपास करणारी ही महिला आंध्रातील असावी, असा कयास सदर बसच्या वाहकाने वर्तविला आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.
यवतमाळ जिल्ह्यात विविध बसस्थानकांवर बॅग, पर्स, चेन लंपास केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेकदा बॅगमधील नेमके दागिनेही चोरीला गेले आहेत. मात्र गेल्या कित्येक वर्षात बॅग लिफ्टरची ही टोळी सापडलेली नाही. दिग्रस, दारव्हा, पुसद, वणी, पांढरकवडा, उमरखेड अशा विविध बसस्थानकांवर यापूर्वीही अनेकदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. यवतमाळच्या बसस्थानकावर तर अशा घटना नवीन नाहीत. चोरीतील रक्कम मोठी असेल तरच ती चोरी पोलिसांपर्यंत जाते. त्यातही अनेकदा ‘घटना नेमकी कोठे घडली’ याचा वाद कायमच असतो. धावत्या बसमध्ये गुन्हा घडला असेल तर सर्वच पोलीस ही घटना आपल्या हद्दीतील नाही म्हणून गुन्हा नोंदविणे टाळतात. अनेक घटनांमध्ये छुटपुट रक्कम असते. कित्येकदा मोठी रक्कम असूनही पोलीस ठाण्यात मिळणाऱ्या ट्रिटमेंटच्या धसक्यानेच कित्येकजण फिर्याद देण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
यवतमाळसारख्या जिल्हा मुख्यालयाच्या बसस्थानकावर पोलीस चौकी आहे. मात्र ती कायम बंद राहते, पोलीस सापडत नाहीत, अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते. तर दोनच कर्मचारी एवढ्या मोठ्या बसस्थानकावर कुठे कुठे पुरणार, असा पोलिसांचा युक्तिवाद असतो. सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ हा बसस्थानकावरील गर्दीचा वेळ असतो. किमान या वेळात तरी चौकीतील पूर्ण कर्मचारी हजर असावे, अशी रास्त अपेक्षा प्रवाशांची असते. मात्र नेमकी याचवेळी पोलीस प्रवाशांना आढळून येत नाही. अनेकदा हे पोलीस गस्तीवर असतात. मात्र एवढ्या गर्दीत हे एक-दोन पोलीस बॅग लिफ्टिंग रोखणार कशी, हाच संशोधनाचा विषय आहे.
पोलीस खात्यातूनही या गर्दीच्यावेळी गायब होण्याचे प्रकार चर्चेत आहे. गुन्हेगारी वर्तूळातील चर्चेनुसार, शक्यतोवर सायंकाळी गर्दीच्यावेळी पोलीस बसस्थानक विकतात. अर्थात गर्दीच्यावेळी ते तेथून गायब राहतात. त्यासाठी विशिष्ट रक्कम आकारली जाते. जणू त्या दोन-तीन तासात गुन्हेगारी टोळ्यांना बसस्थानकावर ‘हात मारण्याची’ मुभा असते. गुन्हेगारांच्या भाषेत याला ‘लिलाव’ म्हणतात. अशावेळी फिर्याद देण्यासाठी चौकीत कुणी आले तरी ती तेवढी गांभीर्याने घेतली जात नाही किंवा कोणी रंगेहात चोर पकडल्यास त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले जाते. कित्येकदा प्रवासी बाहेरगावचा असेल तर काय कारवाई झाली हे पाहण्यासाठी तो तेथे थांबू शकत नाही. नेमकी हीच संधी साधून चोरट्याला सोडून दिले जाते. बसस्थानकाचा गर्दीच्यावेळी लिलाव करण्याचे प्रकार यापूर्वी अमरावतीत घडल्याचे सांगण्यात येते. (जिल्हा प्रतिनिधी)

अशा आहेत टोळ्या अन् त्यांच्या गुन्ह्याची पद्धत
धावत्या बसमध्ये आणि बसस्थानकावर वेगवेगळ्या पद्धतीने चोऱ्या करणाऱ्या टोळ्याही वेगवेगळ्या आहेत. त्यांची गुन्ह्याची पद्धत (मोडस आॅपरेंडी) तेवढीच अफलातून आहे. या पद्धतीबाबत पोलिसांना माहिती असली तरी आतापर्यंत यातील छुटपुट सदस्यच हाती लागले. या टोळ्यांचा म्होरक्या मात्र पोलिसांना शोधता आलेला नाही.

इराणी टोळी : पोलिसासारखी बारिक कटींग, सहा फूट उंची व धिप्पाड शरीरयष्टी ही इराणी टोळीच्या सदस्यांची ओळख आहे. या टोळीचे किमान चार ते पाच सदस्य लांब पल्ल्याच्या एसटीमध्ये चढतात. पहिल्या ते शेवटच्या शीटपर्यंत एकमेकांना कव्हर करत ते टप्प्या टप्प्याने बसतात. एवढ्या प्रवाशातून ‘मालदार’ प्रवासी कोण, याची झाडी करून ते धावत्या बसमध्ये आपले काम फत्ते करतात. ते संपूर्ण बॅग लंपास करीत नाही, केवळ त्यातील सोने तेवढे काढून घेतात. नागपूर-यवतमाळ, नागपूर-अमरावती व हैदराबाद, पुणे, मुंबई अशा लांब पल्ल्यांच्या एसटी बसेस या टोळीचे टार्गेट असते.

दक्षिणेतील टोळी : ही टोळी लक्ष विचलित करून आपले काम फत्ते करते. सायकलमध्ये सुतळी टाकणे, अंगावर घाण टाकणे यासारखे प्रकार ही टोळी करते. एखादा सेवानिवृत्त व्यक्ती बँकेतून सायकलवर निघाला असेल तर त्याच्याकडील कॅशचा अंदाज घेऊन सायकलच्या चाकामध्ये सुतळी टाकली जाते. त्यामुळे सायकल थांबताच सदर व्यक्ती सुतळी काढण्यासाठी प्रयत्न करतो. यादरम्यान, ही टोळी त्याच्या सायकलवर टांगलेली पैशांची पिशवी लंपास करते. अंगावर घाण टाकून बॅग पळविण्याचा या टोळीचा हातखंडा आहे. हे प्रकार सहसा बसस्थानकावर घडतात. या टोळीचे सदस्य बिस्कीट तोंडात चघळून ते कुणाच्या तरी अंगावर मागून थुकतात. नंतर ‘तुमच्या अंगावर घाण आहे’ असे त्या व्यक्तीला सांगून नळाची जागाही दाखवितात. सदर व्यक्ती ती घाण धुण्यासाठी नळावर जाताच त्याची बॅग लंपास केली जाते.

तोतया पोलिसांची टोळी : सीआयडी, पोलीस, सीबीआय अधिकारी, इन्कमटॅक्स-कस्टम अधिकारी असल्याचे सांगून बॅग तपासणीच्या नावाखाली चोरी करणारी टोळी गुन्हेगारी वर्तूळात सक्रिय आहे. ही टोळी हिंगणघाटची (जि.वर्धा) असल्याचे पोलीस सांगतात. कुण्याही प्रतिष्ठिताला बसस्थानकावर किंवा बाहेर रस्त्यात अडवून स्वत:ची ओळख पोलीस म्हणून करून दिली जाते. बॅगमध्ये गांजा, ब्राऊनशुगर असल्याचा संशय व्यक्त करून बॅग तपासली जाते. त्याच आड त्यातील सोने, पैसे लंपास केले जातात.

वृद्ध महिलांना लुटणारी टोळी : वृद्ध महिलांना लुटणाऱ्या टोळीमध्ये काही स्थानिक महिलांचाही समावेश पोलिसात दाखल अनेक गुन्ह्यांवरून आढळून आला आहे. अशा वृद्ध महिलांना सहसा मंदिर परिसरात गाठले जाते. बाहेर लुटारू सक्रिय आहेत, तुमचे दागिने लुटून घेतील, ते इथेच काढून पुडीत बांधा, असे सांगून दागिने उतरविले जातात. दागिने पुडीत बांधल्याचा देखावा निर्माण केला जातो. प्रत्यक्षात वृद्धेकडे दिलेल्या पुडीत काहीच नसते. विशिष्ट भागात प्रतिष्ठिताला मुलगा, नातू झाला असे निमित्त सांगून कपडे वाटप केले जात असल्याचे सांगितले जाते. तुम्ही गरीब दिसावे म्हणून अंगावरील दागिने काढून ठेवा, त्याशिवाय कपडे मिळणार नाही, अशी बतावणी करून वृद्ध महिलांच्या अंगावरील दागिने काढण्याचे प्रकारही घडले आहे. याशिवाय बसस्थानकावर तसेच सार्वजनिक उत्सव-कार्यक्रमातसुद्धा पर्स लंपास करणाऱ्या, मंगळसूत्र हिसकणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरही अनेकदा ही टोळी नोंद झाली आहे.

Web Title: Bags-chain lifters reactivated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.