नऊ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या बगिराच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:30 PM2021-12-03T17:30:01+5:302021-12-03T17:52:38+5:30

करण परोपटे खून प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड आशिष ऊर्फ बगिरा दांडेकर याला स्थानिक गुन्हे शाखेसह सायबर सेलच्या पथकाने गुरुवारी अटक केली. एमपीडीए कायद्यांतर्गत त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

Bagira, who has been charged with nine serious offenses, was caught red-handed | नऊ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या बगिराच्या मुसक्या आवळल्या

नऊ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या बगिराच्या मुसक्या आवळल्या

Next
ठळक मुद्देएमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई : जिल्हा कारागृहात केली रवानगी

यवतमाळ : करण परोपटे खून प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड आशिष ऊर्फ बगिरा रमेश दांडेकर हा एमपीडीए कायद्यानुसार कारवाई होऊ नये, यासाठी दारव्हा तालुक्यातील एका खेडेगावात लपून बसला होता. स्थानिक गुन्हे शाखेसह सायबर सेलच्या पथकाने गुरुवारी त्याच्या मुसक्या आवळल्या असून, एमपीडीए कायद्यांतर्गत त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी व त्याची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार गुन्हेगारांची यादी बनवून त्यांच्यावर एमपीडीए, मोक्कासह हद्दपारीची कारवाई केली जात आहे. करण परोपटे खून प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड आशिष ऊर्फ बगिरा दांडेकर (३२) रा. चमेडियानगर याच्यावरही नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कारवायांना प्रतिबंध करण्याच्या हेतूने यवतमाळ शहर ठाणेदार नंदकिशोर पंत यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.

या प्रस्तावास मंजुरी देत बगिराला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केले होते; परंतु स्थानबद्ध आदेश तामील करता येऊ नये व कायदेशीर अटक टाळण्याच्या हेतूने बगिरा शहरातून फरार होऊन दारव्हा तालुक्यातील एका गावात लपून बसला होता. याची माहिती अपर पोलीस अधीक्षकांना मिळाल्यानंतर बगिराला स्थानबद्ध करण्यासाठी यवतमाळ शहर, स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल अशी विशेष पथके तैनात करण्यात आली होती. या पथकाने दारव्हा तालुक्यातील ग्रामखोपडी येथून बगिराला ताब्यात घेत एमपीडीए कायद्यांतर्गत त्याच्यावर कारवाई करीत त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.

वर्षभरात १२ गुन्हेगार स्थानबद्ध

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी मोक्का, हद्दपारीसह एमपीडीए कारवाईवर पोलीस प्रशासनाने भर दिला आहे. २०२१ या वर्षात अशा १२ गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, इतर गुन्हेगारांवरही कारवाईची प्रक्रियाही सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, नंदकिशोर पंत, सपोनि गणेश वनारे, पोलीस उपनिरीक्षक योगेश रंधे, गजानन डोंगरे, राहुल गोरे, विशाल भगत, कविश पाळेकर, नीलेश राठोड, विनोद राठोड आदींच्या पथकाने बगिराच्या स्थानबद्धतेची मोहीम पार पाडली.

Web Title: Bagira, who has been charged with nine serious offenses, was caught red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.