बिटरगाव येथील पोलीस वसाहतीची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST2019-12-19T06:00:00+5:302019-12-19T06:00:10+5:30
सध्या ही निवासस्थाने जीर्ण अवस्थेत आहे. अनेक निवासस्थाने धोकादायक असून ती कधी कोसळतील, याचा नेम नाही. काही घरे ओसाड पडली आहे. काहींमध्ये पोलीस कुटुंब वास्तव्याला आहे. अनेक घरे दारे व खिडक्यांविना आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागते.

बिटरगाव येथील पोलीस वसाहतीची दुर्दशा
भास्कर देवकते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बिटरगाव : येथील पोलीस वसाहतीमधील निवासस्थानांची प्रचंड दैनावस्था झाली आहे. निवासस्थाने जीर्ण झाल्याने पोलीस कुटुंबीयांचे जीवन धोक्यात आले आहे. जनतेच्या रक्षणकर्त्यांचे कुटुंबीयच भीतीच्या सावटात वावरत आहे.
येथे ब्रिटिशांच्या काळात पोलीस ठाण्याची स्थापना झाली. त्याचवेळी निवासस्थाने बांधली. नंतर वेळोवेळी डागडुजी झाली. मात्र सध्या ही निवासस्थाने जीर्ण अवस्थेत आहे. अनेक निवासस्थाने धोकादायक असून ती कधी कोसळतील, याचा नेम नाही. काही घरे ओसाड पडली आहे. काहींमध्ये पोलीस कुटुंब वास्तव्याला आहे. अनेक घरे दारे व खिडक्यांविना आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागते.
परिसरातील ४५ गावांतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी या पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. दोन अधिकारी आणि २८ कर्मचारी ही जबाबदारी सांभाळत आहे. मात्र त्यांच्या घरांची दूरवस्था झाल्याने त्यांच्याच कुटुंबांचे संरक्षण करणे तयांना अवघड झाले आहे. पावसाचे पाणी मुरून निवासस्थानांच्या भिंती फुगल्या आहे. पोलिसांनीच निवसस्थाने व ठाण्यावर पत्र्याचे शेड टाकले आहे. या निवासस्थानांच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
ब्रिटीेशकालीन ठाण्याची इमारतही जुनाट झाली. १९४७ मध्ये नूतन वास्तू बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र स्वातंत्र्याच्या ७0 वर्षानंतरही त्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. परिणामी धोकादायक ठाणे आणि निवासस्थानांतच अदिकरी, कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. परतीच्या पावसाने ठाण्यातील वायरलेस कक्षातील पीओपीचे छत कोसळले. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. नंतर पोलीस अधीक्षकांनी ठाण्याची तात्पुरती डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ठाण्यावर पत्र्यांचे छत टाकणे व पीओपी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
महिला सुरक्षा कक्षही धोक्यात
मोडकळीस येणाऱ्या संसारात हस्य फुलविण्याचे काम पोलीस ठाण्यातील महिला सुरक्षा कक्षाकडून केले जाते. मात्र येथील या कक्षाचे कामही जीर्ण वास्तूतून केले जाते. या कक्षाची इमारत खूप जुनी आहे. ती मोडकळीस आली आहे. त्यामुळे या महिला सुरक्षा कक्षाचे कामकाज इतर इमारतीत सुरू करण्याची गरज आहे.