कमालच! २० मिनिटात ५६ विषय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:00 IST2022-03-17T05:00:00+5:302022-03-17T05:00:25+5:30
सभा ऑफलाईन घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्रालय स्तरापर्यंत प्रयत्न केले. मात्र कोठूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेरीस ही सभा ऑनलाईन पद्धतीनेच पार पडली. या सभेत विषय पत्रिकेवर तब्बल ५६ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ जिल्हा परिषद योजना अंतर्गत २०२०-२१ चे सुधारित आणि २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक जिल्हा परिषद सेस फंडातून खरेदीच्या साहित्यात दुरुस्ती करण्याचा विषय नामंजूर केले.

कमालच! २० मिनिटात ५६ विषय मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. अवघ्या २० मिनिटात या ऑनलाईन सभेत तब्बल ५६ पैकी ५५ विषयांना मंजुरी देण्यात आली. केवळ एक विषय नामंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषदेची अखेरची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची विरोधकांची मागणी होती. मात्र शासनाच्या निर्बंधांमुळे ही सभा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात आली. सभा ऑफलाईन घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्रालय स्तरापर्यंत प्रयत्न केले. मात्र कोठूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेरीस ही सभा ऑनलाईन पद्धतीनेच पार पडली. या सभेत विषय पत्रिकेवर तब्बल ५६ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ जिल्हा परिषद योजना अंतर्गत २०२०-२१ चे सुधारित आणि २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक जिल्हा परिषद सेस फंडातून खरेदीच्या साहित्यात दुरुस्ती करण्याचा विषय नामंजूर केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सभेला उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाज कल्याण सभापती विजय राठोड, महिला व बाल कल्याण सभापती जयश्री पोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. सभेत अति जीर्ण इमारतींचे निर्लेखन, योजनांची तरतूद, आर्णी तालुक्यातील शेलू (से) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी १४ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता, घाटंजी तालुक्यातील शिवणी पीएचसीच्या बांधकामासाठी ५४ कोटींची प्रशासकीय मान्यता, नरेगाच्या कृती आराखड्यास मान्यता आदी कामांना मंजुरी देण्यात आली.
रेल्वेला पुलासाठी मंजुरी
- जिल्ह्यातून वर्धा-पुसद-नांदेड नवीन ब्रॉडग्रेज रेल्वे मार्ग जात आहे. हा मार्ग जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील काही जमिनीवरून जात आहे. त्यामुळे काही जमीन दुभागत आहे. अशा ठिकाणी रेल्वे विभागामार्फत स्वखर्चाने भूमिगत पूल, उड्डाणपूल आदीच्या बांधकामास सर्वसाधारण सभेने मंजुरी बहाल केली आहे. अध्यक्ष कालिंदा पवार यांनी ही सभा शासनाच्या निर्देशानुसार आभासी पद्धतीने घेण्यात आल्याचे सांगितले. सभेत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास विषयक कामांना तसेच प्रशासनीक, वित्तीय व धोरणात्मक विषयांना मंजुरी दिल्याचे सांगितले.