चौकीदाराला चाकू लावून महिला सहकारी बँकेत दरोड्याचा प्रयत्न
By Admin | Updated: July 1, 2014 23:41 IST2014-07-01T23:41:12+5:302014-07-01T23:41:12+5:30
यवतमाळ महिला सहकारी बँकेच्या येथील बसस्थानकासमोरील शाखेत रात्री सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाला. दरोडेखोरांनी चौकीदाराला चाकूच्या धाकावर धमकावून बँकेत प्रवेश मिळविला.

चौकीदाराला चाकू लावून महिला सहकारी बँकेत दरोड्याचा प्रयत्न
नेर : यवतमाळ महिला सहकारी बँकेच्या येथील बसस्थानकासमोरील शाखेत रात्री सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाला. दरोडेखोरांनी चौकीदाराला चाकूच्या धाकावर धमकावून बँकेत प्रवेश मिळविला. परंतु दिवस उजाडल्याने तिजोरीपर्यंत त्यांना जाता आले नाही. त्यामुळे तिजोरीतील तब्बल ४० लाख रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली.
विशेष असे सदर बँकेच्या तिजोरीत नेहमी ४० ते ५० हजारांची रक्कम राहते. परंतु सोमवारी तिजोरीत ४० लाख रुपयांची रक्कम होती. त्यामुळे या रकमेबाबत टीप तर दिली गेली नाही ना असा संशय घटनास्थळी पोलिसांकडून व्यक्त होताना दिसून आला. दरोडेखोरांची एकूणच तयारी लक्षात घेता ही घटना पूर्व नियोजित होती, असे दिसून येते. दरोडेखोर संख्येने आठ ते दहा जण असल्याचे सांगितले जाते. रात्री बँक असलेल्या इमारतीच्या कंपाऊंड वॉलला भगदाड पाडून त्यांनी आत प्रवेश मिळविला. त्यानंतर मागील बाजूचे कुलूप फोडण्यात आले. नंतर तेथील भिंत फोडून आत प्रवेश मिळविला. सीसीटीव्ही लागलेले असावे, असा अंदाज बांधून त्यांनी तेथील वायरिंग तोडली. विजेचे बोर्डही काढून फेकले. तिजोरी असलेल्या खोलीत लोखंडी दरवाजा असल्याने चोरट्यांनी पुन्हा मागच्या बाजूने आपला मोर्चा वळवून तेथील भिंत फोडली. परंतु तेथेही लोखंडी गजाचा कठडा असल्याने दरोडेखोरांची पंचाईत झाली. तोपर्यंत दिवस उजाडल्याने पकडले जाण्याच्या भीतीने दरोडेखोरांनी तेथून पोबारा केला. विशेष असे बँकेच्या समोरील भागाला तैनात चौकीदाराला या दरोड्याची खबरबातच नव्हती. तर मागील बाजूला तैनात वृद्ध चौकीदाराला दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर धमकाविले. त्यामुळे जीवाच्या भीतीने हा चौकीदार पहाटेपर्यंत झोपेचे सोंग घेऊन राहिला. घटनेची माहिती मिळताच बँकेचे पदाधिकारी, व्यवस्थापक तसेच एसडीपीओ कल्पना भराडे, ठाणेदार गणेश भावसार, एलसीबीचे प्रमुख निलेश ब्राम्हणे घटनास्थळी दाखल झाले. (तालुका प्रतिनिधी)