आधी शेजाऱ्यावर केला हल्ला अन् मग स्वत:च विष प्यायला; दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2022 13:18 IST2022-07-12T13:17:16+5:302022-07-12T13:18:18+5:30
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.

आधी शेजाऱ्यावर केला हल्ला अन् मग स्वत:च विष प्यायला; दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू
बोरीअरब (यवतमाळ) : येथील राजीव नगरमध्ये एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्यावर विळ्याने हल्ला केला. त्यानंतर स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.
गजानन व्यवहारे (५०) असे विष प्राशन करणाऱ्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी कोणताही वाद नसताना अचानक गजानन याने शेजारी राहणारे रामेश्वर डेहणकर (४८) यांच्यावर विळ्याने हल्ला केला. यात डेहणकर यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. यावेळी नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर गजानन तेथून पळून गेला. काही वेळानंतर तो स्वत: गावाबाहेर गेला. यावेळी त्याने सोबत विषाचा डबा नेला होता. त्याने गावाबाहेर विष प्राशन केले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.
गावकऱ्यांनी गंभीर जखमी रामेश्वर डेहणकर आणि विष प्राशन केलेल्या गजाननला तातडीने उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. या दोघांवरही तेथे उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.