अॅथलेटिक्स कोचची ६० दिवसांत केवळ एक दिवस हजेरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:12+5:30
नेहरू स्टेडियमवरच सराव करून शासकीय नोकरीत लागलेल्या गंधे यांची कोच म्हणून नियुक्ती झाल्यावर येथील खेळाडूंमध्ये आशादायक वातावरण होते. मात्र नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसात त्यांची नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर सेवा देण्यात आली.

अॅथलेटिक्स कोचची ६० दिवसांत केवळ एक दिवस हजेरी!
नीलेश भगत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खेळाडूंंना मार्गदर्शन व्हावे म्हणून कायमस्वरूपी नियुक्त करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अॅथलॅटिक्स मार्गदर्शकाने गेल्या ६० दिवसात केवळ एक दिवस येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात हजेरी लावल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अखेर अमरावतीच्या क्रीडा उपसंचालकांनी या मार्गदर्शकाचे वेतन रोखण्याचे आदेश जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले आहेत.
येथील नेहरू स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर लांबीचा सिन्थेटिक ट्रॅक तयार झाल्यावर ट्रॅकवर सराव करणाºया खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शासनाने यवतमाळ क्रीडा कार्यालयातून नागपूर येथे दोन वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अॅथलेटिक्सच्या राज्य क्रीडा मार्गदर्शकाला पुन्हा यवतमाळ येथेच नियमित नियुक्त केले. मात्र सदर राज्य क्रीडा मार्गदर्शक दोन महिन्यांपासून नियुक्त होऊनही केवळ एक दिवस क्रीडा कार्यालयात हजर झाले आहेत.
येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सॉफ्टबॉल, क्रिकेट व अॅथलेटिक्स या तीन खेळांचे राज्य क्रीडा मार्गदर्शक आहेत. संबंधित खेळात जिल्ह्यातील खेळाडूंना मार्गदर्शन करणे, जिल्हा क्रीडा संकुलात प्रशिक्षण केंद्रात येणाºया खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे, स्पर्धेचे आयोजन, उन्हाळी प्रशिक्षण शिबिर राबविणे, खेळाचा प्रचार-प्रसार करणे आदी अनेक कार्य राज्य क्रीडा मार्गदर्शकांना करावे लागते.
१४ जून २०१६ रोजी मूळच्या यवतमाळ येथीलच असलेल्या अरुणा गंधे यांची जिल्हा क्रीडा कार्यालयात अॅथलेटिक्सच्या राज्य क्रीडा मार्गदर्शक म्हणून शासनाने नियुक्ती केली. नेहरू स्टेडियमवरच सराव करून शासकीय नोकरीत लागलेल्या गंधे यांची कोच म्हणून नियुक्ती झाल्यावर येथील खेळाडूंमध्ये आशादायक वातावरण होते. मात्र नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसात त्यांची नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर सेवा देण्यात आली.
दरम्यान नेहरू स्टेडियम येथे विदर्भातील दुसरा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक तयार झाला. तेव्हा जिल्ह्यातील अॅथलिट खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शकांची खेळाडूंकडून मागणी झाल्यावर जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी अरुणा गंधे यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांच्या नियमित सेवेसाठी वरिष्ठांकडे शिफारस केली. खेळाडूंची मागणी मान्य होऊन गंधे यांची २२ जुलै २०१९ रोजी नियमित नियुक्ती केली.
मात्र त्यांनी नियुक्तीच्या दिवशी तीन दिवसांची रजा घेऊन पुन्हा १४ आॅगस्टपर्यंत वैद्यकीय रजा घेतली. तेव्हापासून कोणत्याही सूचनेशिवाय त्या सतत गैरहजर आहेत. नुकतेच ११ सप्टेंबर रोजी सिंथेटिक ट्रॅकचे लोकार्पण करण्यात आले. नवीन ट्रॅकवर सरावासाठी इच्छुक खेळाडू मात्र मार्गदर्शक असूनही पोरके आहेत.
अरुणा गंधे कोणतीही सूचना न देता सतत गैरहजर आहेत. त्याबाबत क्रीडा उपसंचालक अमरावती यांना कळविले असून त्यांनी त्यांचा पगार न काढण्याबाबत सूचना दिली आहे.
- घनश्याम राठोड,
जिल्हा क्रीडा अधिकारी