Yavatmal: सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह एका खासगी एजंटला लाच घेताना रंगेहाथ पकडले
By विशाल सोनटक्के | Updated: May 16, 2025 22:19 IST2025-05-16T22:16:52+5:302025-05-16T22:19:27+5:30
Yavatmal Bribe News: यवतमाळच्या तीन सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह एका खासगी एजंटला यवतमाळ एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले.

Yavatmal: सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह एका खासगी एजंटला लाच घेताना रंगेहाथ पकडले
विशाल सोनटक्के, यवतमाळ: दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळच्या तीन सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह एका खासगी एजंटला यवतमाळ एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पुसद येथे शुक्रवारी वसंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
सूरज गोपाल बाहिते (वय, ३२), मयूर सुधाकर मेहकरे (वय, ३०), बिभीषण शिवाजी जाधव (वय, ३०) तिघेही यवतमाळ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहायक मोटार वाहन निरीक्षक वर्ग ३ या पदावर कार्यरत आहेत. तर खासगी एजंट बलदेव नारायण राठोड (वय, २९), रा. गव्हा, ता. मानोरा, जि. वाशिम, अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत.
तक्रारदार महिला सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका आहेत. ७ मे रोजी कॅम्पदरम्यान या आरटीओ अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ यांच्याकडे केली होती. लेखी तक्रारीवरून शुक्रवारी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यात सूरज बाहिते, मयूर मेहकरे, बिभीषण जाधव यांनी तक्रारदार यांना त्यांच्या प्रशिक्षणार्थींना शिकावू व कायम पक्का परवाना देण्यासाठी खासगी एजंटच्या माध्यमातून संगनमत करून अधिकृत शासकीय चलना व्यतिरिक्त प्रत्येक अर्जामागे २०० रुपयांची मागणी करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. शुक्रवारी सापळा कारवाईदरम्यान एकूण दहा क्लाससाठी २०० रुपयेप्रमाणे दोन हजारांची लाच बलदेव राठाेड याच्यामार्फत तक्रारदाराकडून स्वीकारताच रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी वृत्तलिहिस्तेवर वसंतनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई एसीबी अमरावीचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलिस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलिस निरीक्षक मनोज ओरके, अतुल मते, अब्दुल वसिम, सुधीर कांबळे, सिचन भोयर, राकेश सावसाकडे, सूरज मेश्राम, सरिता राठोड, अतुल नागमोते आदींनी केली.