धान्य महोत्सवाने जागविल्या शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षा
By Admin | Updated: March 28, 2016 02:31 IST2016-03-28T02:31:05+5:302016-03-28T02:31:05+5:30
शेतकऱ्यांना थेट मार्केट उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतुने धान्य महोत्सवाचे आयोजन येथील पोस्टल मैदानावर

धान्य महोत्सवाने जागविल्या शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षा
यवतमाळ : शेतकऱ्यांना थेट मार्केट उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतुने धान्य महोत्सवाचे आयोजन येथील पोस्टल मैदानावर रविवारपासून तीन दिवशीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते व आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
उल्लेखनिय म्हणजे पहिल्याच दिवशी सहा लाख रुपयांच्या धान्यांची उलाढाल या महोत्सवात झाली. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगाने तीन दिवशीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ते २९ मार्चपर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.
सेंद्रिय पद्धतीचा कृषीमाल ग्राहकांना फिरूनही उपलब्ध होत नाही. उपलब्ध झाला तरी त्याची खात्री नाही. यामुळे थेट शेतकऱ्यांना या महोत्सवात उतरविण्यात आले. आत्मा अंतर्गत कृषी विभागाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
सेंद्रिय तूर डाळ, गहू, हळद, हरभरा, मुगडाळ, उडिद दाळ, जवस, कांदा, ज्वारी यांसह डाळींब, पपई, चिंच, टमाटर, आलू, कोबी, मिरची, शेवगा यासारख्या विविध वस्तू धान्य महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
गुळ, बेसण, सहद, लोणचे, जाम, पापड, सॉस, बेलाचा रस, सोया लाडू, अंडी यांसह अनेक वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. विक्रीसाठी आलेले धान्य खरेदी केल्यास त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहे. यामुळे यवतमाळकरांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता येत असल्याने ग्राहकांची गर्दी महोत्सवाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही गर्दी पुढील दोन दिवसही अपेक्षित आहे.
(शहर वार्ताहर)
मशरूमची धूम
४शेतकऱ्यांच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण असलेले उत्पादन म्हणून मशरूमकडे पाहले जाते. सहाशे रुपये किलो याचे दर आहेत. साधारणत: पुणे आणि मुंबईतच मशरुम विकत मिळतो. सहसा यवतमाळच्या बाजारात हा मशरुम उपलब्ध होत नाही. यामुळे मशरुमची शेती आणि मशरुमची गुणवत्ता पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. बाभूळगाव तालुक्यातील कोल्हीच्या शेतकरी पुत्राने ही शेती यशस्वीपणे केली आहे. गोंदीया जिल्ह्यातील शेतकरी कैलास राऊत यवतमाळात हजेरी लावली होती. त्यांनी जवस, बेलाचा रस, चिंचेचा सॉस विक्रीसाठी आणला होता.
भविष्यात शेतकऱ्यांसाठी कायमस्वरुपी मार्केट
४या धान्य महोत्सवासंदर्भात आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे आणि उपसंचालक दत्तात्र्यय काळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी भविष्यात कायमस्वरुपी मार्केट उपलब्ध व्हावे, म्हणून जिल्हा परिषदेशी करार करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. तीन उत्कृष्ट स्टॉलला बक्षिस दिले जाणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाचे शेतकरी वर्गातून स्वागत केले गेले.
शेतकऱ्यांसाठी २५ हजार कोटी
४दृष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी युती शासन ठामपणे उभे आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांने केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प सादर केला आहे. यातून २५ हजार कोटींची तरतूद शेतकऱ्यांसाठी केली आहे. विदर्भातील शेतकऱ्याला यातून दृष्काळी लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी न डगमगता शेती कसावी आणि सर्वच नागरिकांनी धान्य महोत्सवातून धान्याची खरेदी करावी, असे आवाहन या महोत्सवा दरम्यान आपल्या उद्घाटनपर भाषणातून पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. यावेळी आमदार मदन येरावार यांनी अस्मानी, सुलतानी संकटांशी सामना करताना शेतकऱ्यांनी पिकपद्धती बदलण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. यासोबतच वाढत्या लोकसंख्येला हवे असलेले धान्य मिळवून देण्यात शेतकऱ्यांचे मोठे योगदान असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी, सीईओ, कृषी अधिक्षक, एसपी आदींनी विचार व्यक्त केले.