माँ दुर्गेचे आगमन
By Admin | Updated: October 14, 2015 02:50 IST2015-10-14T02:50:34+5:302015-10-14T02:50:34+5:30
विमानातून पुष्पवृष्टीयवतमाळ : ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत माँ दुर्गेचे आगमन झाले आणि यवतमाळच्या प्रसिद्ध दुर्गोत्सवाला प्रारंभ झाला.

माँ दुर्गेचे आगमन
विमानातून पुष्पवृष्टीयवतमाळ : ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत माँ दुर्गेचे आगमन झाले आणि यवतमाळच्या प्रसिद्ध दुर्गोत्सवाला प्रारंभ झाला. विमानातून करण्यात आलेली पुष्पवृष्टी आणि विविध प्रांतातील परंपरागत नृत्याने माँ दुर्गेचे स्वागत करण्यात आले.
यवतमाळ शहर माँ दुर्गेच्या स्वागतासाठी सज्ज होते. सकाळपासून भक्तांचे लोंढे यवतमाळात येत होते. विविध मंडळांनी मिरवणुका काढून देवीची स्थापना केली. यवतमाळातील आर्णी मार्ग, लोखंडीपूल परिसर, पॉवर हाऊस, वडगाव आणि माळीपुरात मंडळांनी देवी नेण्यासाठी गर्दी केली होती. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या बालाजी चौकातील दुर्गोत्सव मंडळाने शोभायात्रेवर विमानातून पुष्पवृष्टी केली. विविध मंडळांच्या शोभायात्रेत प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले होते. बेटी बचाव यासह इतर विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत ढोलताशांचा गजर सुरूच होता.
कडाडणारे ढोलताशे अन् परंपरागत लोकनृत्य
यवतमाळ : कडाडणारे ढोलताशे, गुलालांची उधळण, जय माता दीचा गजर आणि विविध प्रांतातील लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या नृत्य आदींनी यवतमाळकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यवतमाळच्या प्रसिद्ध दुर्गोत्सवानिमित्त विविध मंडळांनी शोभायात्रा काढून माँ दुर्गेचे विधिवत स्थापना केली. सुवर्ण महोत्सव साजरे करणाऱ्या बालाजी दुर्गोत्सव मंडळाची शोभायात्रा सर्वाधिक लक्षवेधक होती.
यवतमाळ शहरातील दुर्गोत्सव म्हणजे जिल्ह्यासाठी पर्वणी असते. विविध देखावे आणि कार्यक्रमांसाठी हा दुर्गोत्सव प्रसिद्ध आहे. मंगळवारी घटस्थापनेनिमित्त शहरातून निघालेल्या दुर्गोत्सवाने यवतमाळकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
बालाजी चौकातील दुर्गोत्सव मंडळाने हिमालयाची विशाल प्रतिकृती साकारली असून त्याच तोडीची स्थापनेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विविध प्रांतातील लोकनृत्य सादर करणारे कलावंत होय. सजविलेल्या बैलगाडीवर सनई चौघडा वाजविणारे कलावंत नागरिकांचे लक्ष वेधत होते. लेझीम पथक, पोतराज, गोंधळी नृत्य, मणिपुरी नृत्य, राजस्थानी नृत्य, मयूर नृत्य, कुचीपुडी नृत्य यासह विविध नृत्य कलावंतांनी सादर केले. शहराच्या प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक मार्गक्रमण करीत होती. त्यावेळी विमानातून पुष्पवृष्टी केली.
येथील आझाद मैदानावर स्थापन करण्यात येणाऱ्या गुजरात नवरात्रोत्सव मंडळाची शोभायात्राही लक्षवेधक होती.
भाविकांनी पारंपरिक गुजराती पद्धतीने वेशभूषा केली होती. तर आदिवासी वेशभूषेतील कलावंत नृत्य सादर करीत होते. ढोल-ताशा रॉक बॅन्डच्या सोबतीला परंपरागत वाद्यही होते. वडगावच्या सुभाष क्रीडा मंडळाने महाराष्ट्रीयन वेशभूषेत माँ अंबेचे स्वागत केले. हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळाच्या शोभायात्रेतील टाळमृदुंगाचा गजर भाविकांना तल्लीन करीत होता.
शहरात विविध ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी प्रत्येक मंडळाने शोभायात्रा काढली होती. यासोबतच यवतमाळातून मातेची मूर्ती घेऊन जाण्यासाठी ग्रामीण भागातील मंडळाचे कार्यकर्ते विविध वाहनातून आले होते. मातेचा जय जयकार करीत ही मंडळी आपल्या गावी जात होती. येथील लोखंडी पूल, आर्णी मार्ग, वडगाव आणि माळीपुऱ्यात देवीला नेण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली.
दुर्गोत्सवासाठी यवतमाळ शहर नटले असून विद्युत रोषणाई
आणि देखाव्यांनी शहरात
उत्साहाचे वातावरण निर्माण
केले आहे.