आर्णीची आरोग्य सेवा सलाईनवर
By Admin | Updated: December 25, 2016 02:35 IST2016-12-25T02:35:09+5:302016-12-25T02:35:09+5:30
तालुक्याची आरोग्य सेवा कोलमडली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे ही सर्वात मोठी समस्या आहे.

आर्णीची आरोग्य सेवा सलाईनवर
रुग्णांची गैरसोय : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त
हरिओम बघेल आर्णी
तालुक्याची आरोग्य सेवा कोलमडली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे ही सर्वात मोठी समस्या आहे. या प्रकारात रुग्णांची गैरसोय सुरू आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना नाईलाजाने तालुक्याच्या ठिकाणी येऊन उपचार घ्यावे लागत आहे. यात त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करण्यासोबतच वेळेचाही अपव्यय होत आहे.
सातही दिवस २४ तास आरोग्य सेवा दिली जाईल, असे शासनाकडून सांगितले जाते. मात्र वास्तविकता वेगळीच आहे. तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र, तर दोन आयुर्वेद रुग्णालय आहेत. या सहा केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दहा पदे मंजूर आहेत. यातील दोन पदे रिक्त आहेत. कार्यरत असलेल्या आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी दोन वैद्यकीय अधिकारी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी सतत बाहेर असतात.
डॉ. आम्रपाली गवळी आणि डॉ. राहुल वाघमारे यांची नियुक्ती लोणबेहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे. मात्र त्यांना सातत्याने शस्त्रक्रियेसाठी बाहेर पाठविले जाते. सदर आरोग्य केंद्र महामार्गाला लागून आहे. याठिकाणी रुग्णांची सतत ये-जा सुरू असते. अपघात, गंभीर रुग्ण याठिकाणी येतात. त्यामुळे डॉक्टरांची उपस्थिती याठिकाणी आवश्यक आहे. मात्र तसे होत नाही.
डॉ. महेश लमगे हे २० नोव्हेंबर, तर डॉ. विशाखा खडसे २७ आॅक्टोबरपासून वैद्यकीय रजेवर आहेत. एकाची नियुक्ती सावळीसदोबा, तर एकाची लोणी येथील आरोग्य केंद्रात आहे. या दोनही ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांची गैरसोय सुरू आहे.
कवठा(बाजार) येथील आयुर्वेदिक रुग्णालयात नियुक्ती असलेल्या डॉ. रश्मी आडे यांना सावळीसदोबा येथील आरोग्य केंद्राचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे कवठा(बाजार) येथे रुग्णांची गैरसोय होत आहे. भानसरा येथील आयुर्वेद रुग्णालयात नियुक्त असलेले डॉ. दीपक आलनदास यांची अतिरिक्त नियुक्ती म्हसोला प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्याने भानसरा येथील रुग्णांना तत्काळ आणि योग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामानिमित्तही आरोग्य केंद्र सोडावे लागते. या प्रकारात नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतो. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरून आरोग्याचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.