प्रतिकुलतेवर मात करणारी आर्णीची ‘प्रतिभा’
By Admin | Updated: March 8, 2017 00:13 IST2017-03-08T00:13:54+5:302017-03-08T00:13:54+5:30
परिस्थिती हलाखीची, कौटुंबिक कलह, समाजाची सदा वक्रदृष्टी...सामान्य महिलेने खचून जावे इतकी अपरिमीत प्रतिकुलता.

प्रतिकुलतेवर मात करणारी आर्णीची ‘प्रतिभा’
राजेश कुशवाह आर्णी
परिस्थिती हलाखीची, कौटुंबिक कलह, समाजाची सदा वक्रदृष्टी...सामान्य महिलेने खचून जावे इतकी अपरिमीत प्रतिकुलता. पण तिने सर्व अडथळ््यांवर मात करीत एकाचवेळी नृत्य, चित्रपट अभिनय, साहित्य लेखन आणि पत्रकारितेसारख्या विविध क्षेत्रात पाय रोवले. एवढेच नव्हे तर आता नव्या पिढीला शिक्षण देण्याचा चंग बांधला आहे. प्रतिभा गेडाम यांच्या रूपाने महिला दिनी नव्या ‘प्रतिभे’चा हा परिचय.
पुरूषप्रधान संस्कृतिमध्ये महिला चुल आणि मूल एवढ्याच परिघात मर्यादित होती. येथील प्रतिभाताई गेडाम यांनी या परिघाला भेदण्याचे ठरविले. मात्र परिस्थिती आड येऊ लागली. पण प्रतिभेला आव्हान मिळाले की प्रतिभावंत त्यातूनच संधी निर्माण करतो. प्रतिभातार्इंनी तेच केले.
प्रतिभातार्इंचे बालपण आर्णी, उमरखेड, वणी, पांढरकवडा आदी शहरांमध्ये गेले. बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. मात्र त्यांच्या स्थूल शरिरामुळे कुणीही संधी देत नव्हते. वणी येथे याच कारणावरून शाळेच्या कार्यक्रमात शिक्षकांनी त्यांना संधी नाकारली. तो अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. आता स्वत:च नृत्याचे धडे गिरवायचे, असा निश्चय त्यांनी केला. रेडिओवरील गाणे ऐकत-ऐकत त्यांनी सराव केला. नृत्यात निपूण झाल्या. दरम्यान पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले.
अभिनयाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. १९७८ मध्ये त्यांनी ‘झाले मी तुझ्यापरी’ हे चार अंकी नाटक स्वत: लिहिले. त्याचा पहिला प्रयोग ज्ञानमंदिराच्या ओट्यावर झाला. यावेळी स्व. नेवारे गुरूजींनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
ही कौतुकाची थाप मिळताच प्रतिभातार्इंनी अखंड वाटचाल सुरू केली. आतापर्यंत त्यांनी ४५० नाटकांमध्ये आणि चार चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. आत्मदाह, धीटबाई धिटुकली, नवरा देशी बायको परदेशी व पिंकी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका अनोख्या ठरल्या आहेत. एखाद्याचे नशीब, नवा संसार, सरपंच, खुनी पाटील बेईमान, मेंढर, पाटलाची पोरं जरा जपून आदी नाटकांचे प्रयोग विदर्भ-मराठवाड्यातील मोठ्या शहरात खूप गाजले.
अभिनयासोबतच त्यांना साहित्यिक दृष्टी आहे. सामाजिक विषयांवर कथा, कविता, नाटक लिहिण्याचा त्यांना छंदच जडला. पत्रकारितेच्या क्षेत्रात नाव कमाविलेले त्यांचे पती चारुदत्त माधव बागुल यांनी प्रतिभातार्इंच्या कलागुणांची कदर केली. विदर्भाचा रॉबीनहुड श्यामादादा कोलाम यांची मुलाखत या दाम्पत्याने घेऊन प्रकाशित केली होती. आयुष्यात त्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला. खास करून बाळासाहेब शिंदे, वऱ्हाडकर, नेवारे यांनी प्रोत्साहन दिले. गजल सम्राट सुधाकर कदम यांनी तर ‘डबक्यातून बाहेर पड, तरच जगाची खरी माहिती होईल’ असे सांगत प्रोत्साहन दिले. दोन मुले, एक मुलगी यांना घडवित प्रतिभातार्इंनी कलेला आकार दिला. त्यांची मुलगी प्रणया आईच्या कलेचा वारसा घेत दोन विषयात पदव्युत्तर पदवीधर झाली. एक मुलगा मंत्रालयात तर दुसरा शिक्षण घेत आहे.