ढाणकी शिवारात सशस्त्र दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST2020-08-31T05:00:00+5:302020-08-31T05:00:25+5:30
ठोस रक्कम हाती न लागल्यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी एका सालगड्याला थेट विहिरीत फेकून दिले. मात्र त्याला पोहता येत असल्याने त्याचा कसाबसा जीव वाचला. दरोडेखोरांनी एका खोलीत ठेवलेला कडबासुद्धा बाहेर फेकून दिले. मात्र तेथेही त्यांना काहीच मिळाले नाही. रात्री १० वाजताच्या सुमारास शेतमालक संजय जिल्लावार हे शेतात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

ढाणकी शिवारात सशस्त्र दरोडा
लोकमत न्यूज नेटवर्क
ढाणकी : परिसरातील खरुस मार्गावर असलेल्या संजय जिल्लावार यांच्या शेतात सालगड्याच्या झोपडीवर दरोडा पडला. १२ ते १५ जणांनी झोपडी वजा घर उद्ध्वस्त केले. सालगडी नागोराव वामन डहाके (२८) याच्यासह त्याच्या सोबत्याला जबर मारहाण केली. डहाके व सोबत्याच्या पत्नीच्या अंगावरील दागिने लुटून नेले. ही घटना शनिवारी रात्री दरम्यान घडली.
ठोस रक्कम हाती न लागल्यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी एका सालगड्याला थेट विहिरीत फेकून दिले. मात्र त्याला पोहता येत असल्याने त्याचा कसाबसा जीव वाचला. दरोडेखोरांनी एका खोलीत ठेवलेला कडबासुद्धा बाहेर फेकून दिले. मात्र तेथेही त्यांना काहीच मिळाले नाही. रात्री १० वाजताच्या सुमारास शेतमालक संजय जिल्लावार हे शेतात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
त्यांनी तत्काळ बिटरगाव पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार विजय चव्हाण व उपनिरीक्षक रामकिसन जायभाये यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तेथे पाहणी केली. मात्र रात्र असल्याने पुढील तपास होऊ शकला नाही. रविवारी सकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्तार बागवान यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेने ढाणकी परिसरातील शेतशिवारात खळबळ उडाली आहे. सालगड्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.