जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात मनमानी
By Admin | Updated: November 16, 2014 22:54 IST2014-11-16T22:54:52+5:302014-11-16T22:54:52+5:30
येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात गेल्या काही दिवसात मनमानी कारभार सुरू आहे. नियमांचा बागुलबुवा करत हकनाक वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. नियमानुसार असलेल्या

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात मनमानी
यवतमाळ : येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात गेल्या काही दिवसात मनमानी कारभार सुरू आहे. नियमांचा बागुलबुवा करत हकनाक वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. नियमानुसार असलेल्या प्रकरणातही सातत्याने त्रुट्या काढून आलेल्या व्यक्तीला त्रस्त करण्याचा एककल्ली कार्यक्रम येथील अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. साध्या साध्या गोष्टीसाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी येथे खर्ची घालावा लागत आहे.
शल्य चिकित्सक कार्यालयात सामान्य नागरिकापेक्षा सर्वाधिक शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनाच येरझारा माराव्या लागतात. आरोग्यविषयक तक्रारी असल्यास किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रासलेली असल्यास दीर्घ काळाच्या रजेसाठी या कार्यालयातून प्रमाणपत्र घेणे क्रमप्राप्त ठरते. अनेकांना अडचणीच्या क्षणासाठी शासनाकडून वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके दिली जातात. या देयकांना मंजुरी देण्याचा अधिकारही जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास आहे. मानसिकदृष्ट्या खचलेल्या आणि आरोग्यविषयक समस्यांनी पिचलेल्या व्यक्तीला येथे हमखास नाडवले जाते. अनावश्यक कारण पुढे करून जाणिवपूर्वक अधिकारात नसलेले आक्षेप या वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलांवर घेतले जातात. त्यामुळे आर्थिक अडचणीच्या काळातही शासनाच्या या योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळत नाही. सामान्य नागरिकांनाही येथे असाच अनुभव आहे. बरेचदा शाळकरी विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज भासते. अशा विद्यार्थ्यांना एचआयव्हीसारख्या २५ ते ३० चाचण्या करण्यास भाग पाडले जाते. यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याकरिता एक ते दीड महिन्याचा कालावधी लागत आहे.
यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणात अडवणूक झाली नव्हती. पूर्वीही आर्थिक देवाणघेवाणीचा व्यवहार येथे चालत होता. मात्र समोरच्या व्यक्तीची गरज ओळखून संवेदनशीलतेने काम हातावेगळे केले जात होते. आता साध्या साध्या प्रमाणपत्रासाठी एक ते दीड महिना कालावधी लागत असल्याने एक प्रकारे अडवणुकीचेच काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. बरेचदा शासनाच्या निकषांना केराची टोपली दाखवून संबंधित नागरिकाला अथवा कर्मचाऱ्याला त्याच्या लाभापासून वंचित ठेवले जाते. या बाबत तक्रार घेवून गेलेल्या कर्मचाऱ्यांनी उलटकरणी लाच देण्याचा प्रयत्न करत असल्याची पोलिसात तक्रार देणार, अशी धमकी दिली जाते. या अजब प्रकारामुळे सर्वच जण त्रासलेले आहे. भेटीसाठी आलेल्या व्यक्तीलाही उशिरापर्यंत ताटकळत ठेवण्यात येते.
येथील महिला कर्मचाऱ्यांना साडेपाच नंतरही कार्यालयीन कामकाजात व्यस्त ठेवले जाते. अशा अनेक प्रकारचे आरोप केले जात आहे. गेल्या काही दिवसात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय हे अनेकांसाठी खऱ्या अर्थाने शल्य देणारे ठरले आहे. येथील कुठलेही काम नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)