उत्तरपत्रिका लिहावी नेटकी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:31+5:30
दहावी, बारावी या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थी अधिकाधिक भर पाठांतर, घोकंपट्टी यावर देतात. या सगळ्यांमध्ये लिखाणाच्या कौशल्याकडे मात्र दुर्लक्ष होते. मग ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची त्रेधा उडते. पहिले एक-दोन पाने चांगले असलेल्या अक्षरांचा आकार नंतर प्रत्येक पानागणिक बेढब होत जातो. त्यामुळे लिखाणाची गती शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा सल्ला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रशांत गावंडे यांनी दिला. बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य अपुरे पडत आहे, याची जाणीव शिक्षकांना होते.

उत्तरपत्रिका लिहावी नेटकी...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बारावीच्या परीक्षा आता संपत आल्या असून दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव घेतलेला असतो, पण दहावीचे विद्यार्थी ‘बोर्ड’ या नावानेच अर्धे घाबरलेले असतात. त्यामुळेच मुलांची बोर्डाची भीती दूर व्हावी आणि उत्तम पद्धतीने उत्तरे लिहिता यावी म्हणून ‘उत्तरपत्रिका लिहावी नेटकी’ असा सल्ला ‘लोकमत’च्या माध्यमातून तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांनी दिला.
दहावी, बारावी या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थी अधिकाधिक भर पाठांतर, घोकंपट्टी यावर देतात. या सगळ्यांमध्ये लिखाणाच्या कौशल्याकडे मात्र दुर्लक्ष होते. मग ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची त्रेधा उडते. पहिले एक-दोन पाने चांगले असलेल्या अक्षरांचा आकार नंतर प्रत्येक पानागणिक बेढब होत जातो. त्यामुळे लिखाणाची गती शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा सल्ला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रशांत गावंडे यांनी दिला.
बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य अपुरे पडत आहे, याची जाणीव शिक्षकांना होते. काही मोजक्या उत्तरपत्रिका सोडल्या तर उर्वरित उत्तरपत्रिकांमध्ये लिखाणातील सुसूत्रता, वळणदार अक्षरे, सुटसुटीतपणा, नीटनेटकेपणा यांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे लेखनकौशल्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे.
उत्तरपत्रिका लिखाणाचे काही नियम, विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याची गरज
आजपासून विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा मंगळवार ३ मार्चपासून प्रारंभ होत आहे. यंदा जिल्ह्यातील ४४ हजार १७० विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहे. १५६ केंद्रांवर शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. २३ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. शिक्षण विभागाचे ५ आणि डायटचे १ भरारी पथक कॉपीमुक्त परीक्षेसाठी लक्ष ठेवणार आहे. ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवरील कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
उत्तरपत्रिका हाती येताच पहिल्यांदा संपूर्ण उत्तरपत्रिका पाहून घ्यावी. अनेकदा उत्तरपत्रिकेचे धागे निसटलेले असतात. अशी उत्तरपत्रिका बदलून घ्यावी. परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचावे. उत्तरे लिहितांना वारंवार खाडाखोड करू नये. त्यासाठी खात्री असलेले प्रश्न आधी सोडवावे. त्यामुळे पेपर तपासणाऱ्यावर चांगले ‘इम्प्रेशन’ पडेल. शेवटच्या दहा मिनिटा आपण सोडविलेली उत्तरे पुन्हा तपासून दुरुस्त करावी, काही राहून गेलेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा.
- डॉ. प्रशांत गावंडे, वरिष्ठ अधिव्याख्याता, डायट, यवतमाळ
अक्षर चांगले असेल तर लेखनाला अधिक गुण मिळू शकतात.
उत्तरातील नेमकेपणा, आटोपशीरपणा महत्त्वाचा असून परीक्षेत सलग लेखनाचा वेग कायम ठेवावा.
परीक्षेसाठी वापरण्यात येणाºया पेनाचा उत्तम सराव झालेला असावा. अगदी नवा कोरा पेन नेणे टाळावे.
उत्तरे लिहिताना मजकुरातील महत्त्वाचा भाग अधोरेखित करावा. अधोरेखा आवश्यक तितकीच असावी.
परिच्छेदाची सुरुवात पानाच्या डावीकडे साधारण १ सेंटीमीटर अंतर ठेवून केलेली असावी आणि एका परिच्छेदात शक्यतो एकाच विवेचनाचा मुद्दा लिहिलेला असावा.
विरामचिन्हांचा वापर उत्तरपत्रिकेत अचूक करावा.
उत्तरलेखनात कृत्रिम किंवा पुस्तकी भाषा टाळून स्वत:च्या भाषेतील उत्तरेच प्रभावीपणे मांडावी.
शक्यतो क्रमवार उत्तरे लिहावी. प्रश्न काळजीपूर्वक वाचावे. लिहिलेला बैठक क्रमांक तपासून घ्यावा.
सारांश लेखन करताना परिच्छेदातील मध्यवर्ती कल्पना, विचार, मुख्य आशय लक्षात घ्यावा. आशयसूत्र बदलणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी.
प्रत्येक ओळीत बसणारी शब्दसंख्या प्रमाणबद्ध असावी, खूप दूर किंवा खूप जवळ अक्षरे काढणे टाळावे.
घाईघाईत लिहिताना अनावधानाने वाक्य सदोष होते. त्यामुळे जे लिहित आहात, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. खाडाखोड टाळावी.