राळेगाव तालुक्यात आणखी एका शेतकऱ्याची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:11 IST2017-12-10T01:11:00+5:302017-12-10T01:11:24+5:30
शेतात जागलीस गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने फडशा पाडला. विहिरगाव शिवारात अडणी येथील शेतकऱ्याला ठार मारले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राळेगाव तालुक्यात वाघाचा हा सातवा बळी ठरला आहे. प्रशासनाकडून बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

राळेगाव तालुक्यात आणखी एका शेतकऱ्याची शिकार
लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : शेतात जागलीस गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने फडशा पाडला. विहिरगाव शिवारात अडणी येथील शेतकऱ्याला ठार मारले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राळेगाव तालुक्यात वाघाचा हा सातवा बळी ठरला आहे. प्रशासनाकडून बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आणखी किती बळी जाऊ देणार, हा त्यांचा प्रश्न आहे.
वडकी येथून दहा किलोमीटरवरील अडणी येथील चंडकू भोनू फुटकी (५०) हे स्वमालकीच्या विहिरगाव शिवारात असलेल्या शेतात जागलीसाठी गेले होते. दुपारपर्यंत घरी पोहोचले नाही. कुटुंबातील लोकांनी शोध घेतला असता वाघाने ठार मारलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह शेतापासून तीन किलोमीटर अंतरावर आढळून आला.
शेतात असलेल्या झोपडीपासून दूरपर्यंत रक्त पडून असल्याचे आढळल्याने चंडकू यांचा शोध लागला. या शेतकऱ्याच्या शेतात तूर, कापूस ही पिके आहेत. त्याचे संरक्षण करण्यासाठी गेलेले चंडकू वाघाचे बळी ठरले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व मोठा आप्त परिवार आहे. राळेगाव परिसरात वाघाची प्रचंड दहशत आहे. शेतकरी, शेतमजूर कामावर जाण्याची हिंमत करत नाही. परिणामी शेतीची कामे रखडली आहे, तर मजुरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
वनविभागाने गुंडाळली वाघाची शोध मोहीम
राळेगाव तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरू असताना वनविभागाने अर्ध्यावरच नरभक्षक वाघाची शोध मोहीम गुंडाळली. लोकांनी दिलेल्या माहितीची कुठलीही दखल घेतली जात नाही. परिसरात वाघ दिसल्याचे सांगितल्यानंतर वनविभागाकडून साधा शोध घेण्याचाही प्रयत्न केला जात नाही. शिवाय घटना घडल्यानंतर तातडीने पोहोचण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. वनविभागाच्या या भूमिकेमुळेच सखी कृष्णापूर येथे उपविभागीय अधिकारी व त्यांच्या पथकाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आता विहिरगाव येथील घटनेबाबतही तेच घडले. पोलीस पोहोचले मात्र वनविभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याची याठिकाणी उशिरापर्यंत उपस्थिती नव्हती. त्यामुळे नागरिकांनी चंडकू यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
एसडीओंचे वाहन पेटवूनही बोध नाही
राळेगाव तालुक्यात वाघाचे बळी वाढत असतानाच गुराख्याला ठार मारल्याने नागरिकांनी सखी कृष्णापूर येथे राळेगाव उपविभागीय अधिकाºयांचे वाहन जाळले होते. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर सखी परिसरात वाघाचा शोध सुरू झाला. तब्बल १५ दिवस पथकाचा या ठिकाणी मुक्काम होता. ट्रॅप लावले, पिंजऱ्यामध्ये सावज सोडले. यानंतर मात्र वाघ पकडण्याची मोहीम थांबली. लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले असतानाही प्रशासनाकडून ठोस प्रयत्न झाले नाही.