वन विभागाच्या भरतीत एकाच्या नावाने धावला दुसराच उमेदवार; दोघांवर गुन्हा दाखल

By विशाल सोनटक्के | Published: March 1, 2024 10:34 PM2024-03-01T22:34:25+5:302024-03-01T22:34:51+5:30

व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेजमधून फुटले बिंग

Another candidate ran in the name of one in the forest department recruitment; A case has been registered against both | वन विभागाच्या भरतीत एकाच्या नावाने धावला दुसराच उमेदवार; दोघांवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या भरतीत एकाच्या नावाने धावला दुसराच उमेदवार; दोघांवर गुन्हा दाखल

विशाल सोनटक्के, यवतमाळ : वनरक्षकाच्या ५५ जागांसाठी वन विभागातर्फे पदभरती घेण्यात आली. शेवटच्या चाल चाचणीनंतर अंतिम यादी प्रसिद्ध झाली. नियुक्तीपत्र देण्यापूर्वी केलेल्या पडताळणीत एका उमेदवाराबाबत संशय निर्माण झाल्याने त्याला बोलावून चौकशी केली असता पाच किमी धावण्याच्या शर्यतीसाठी त्याने डमी उमेदवार उभा केल्याचे पुढे आले. या प्रकरणी दोघाजणावर अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

वन विभागाच्या प्रादेशिक निवड समितीचे सचिव धनंजय वायभासे यांच्या उपस्थितीत या अंतिम निवड यादीतील पात्र ५५ उमेदवारांच्या कागदपत्रांचे पुनवरालोकन करण्यात आले. यामध्ये इडब्ल्यूएस प्रवर्गातून पात्र ठरलेल्या रवींद्र सोमनाथ पायगव्हाण (२८) रा. पळाशी पोस्ट बनोटी सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर याच्यावर संशय निर्माण झाला. त्याच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात आली. शिवाय पदभरती प्रक्रियेदरम्यानचे व्हिडीओ चित्रीकरण, सीसीटीव्ही फुटेज, अर्जावरील फोटोग्राफ याची तपासणी केली असता रवींद्र पायगव्हाण याच्या जागेवर पाच किमी धावण्याच्या स्पर्धेत दुसराच युवक धावल्याचे स्पष्ट झाले.

हा पुरावा हाती आल्यानंतर निवड समितीने रवींद्र पायगव्हाण याला चौकशीसाठी बोलाविले. त्याच्या पुढे संपूर्ण पुरावे ठेवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत पाच किलोमीटर धावण्यासाठी प्रदीप राजपूत (रा. जालना) याला उभे केल्याचे सांगितले. यावर निवड समितीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमर सिडाम यांना प्राधिकृत करून या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्याचे निर्देश देण्यात आले. त्यावरून अवधूतवाडी पोलिस ठाण्यात रवींद्र पायगव्हाण व त्याचा मित्र प्रदीप राजपूत या दोघाविरुद्ध कलम ४१९, ४२०, ४६५, ४७४, ३४ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

गुण वाढविण्याचा प्रकार असा आला अंगलट

वनरक्षकाच्या ५५ जागांसाठी ११ हजारांवर उमेदवारांनी लेखी व मैदानी चाचणी दिली. लेखी परीक्षेत गुणवत्ता घेणाऱ्या रवींद्र पायगव्हाण याला पाच किमी धावण्याच्या स्पर्धेमध्ये टिकाव लागणार नाही, अशी भीती होती. यातूनच त्याने मित्र प्रदीप राजपूत याला स्वत:च्या नावावर धावण्यासाठी उभे केले. प्रदीपने १७ मिनिटात पाच किमी अंतर धावून पूर्ण केले. त्यानंतर झालेल्या २४ किमी चाल चाचणीमध्ये रवींद्र स्वत: उतरला. त्यामुळे त्याची अंंतिम यादीत निवड झाली. मात्र, पारदर्शक प्रक्रियेमुळे गुण वाढविण्याचा हा प्रकार त्याच्या अंगलट आला.

Web Title: Another candidate ran in the name of one in the forest department recruitment; A case has been registered against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.