संतप्त शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:21+5:30
यवतमाळचे कापूस संकलन केंद्र १० दिवसांपासून बंद होते. सोमवारी केंद्र खुले झाले. एकाच वेळी वाहनांची गर्दी वाढली. आवक आवाक्याबाहेर गेली. यामुळे बाजार समितीने अतिरिक्त वाहने कॉटन मिनी मिशन प्रोजेक्टकडे वळविले. या ठिकाणीही प्रचंड गर्दी झाली. या स्थितीत दर दिवसाला केवळ ५० वाहनांचे मोजमाप केले जात आहे. या ठिकाणी ६०० ते ८०० वाहनांची आवक आहे.

संतप्त शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कापूस खरेदी सुरू होताच पणनकडे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. क्षमतेपेक्षा अधिक वाहने आल्याने शेतकऱ्यांना मुक्काम ठोकावा लागत आहे. चार दिवसांपासून आलेल्या वाहनांचा मंगळवारीही काटा झाला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.
यवतमाळचे कापूस संकलन केंद्र १० दिवसांपासून बंद होते. सोमवारी केंद्र खुले झाले. एकाच वेळी वाहनांची गर्दी वाढली. आवक आवाक्याबाहेर गेली. यामुळे बाजार समितीने अतिरिक्त वाहने कॉटन मिनी मिशन प्रोजेक्टकडे वळविले. या ठिकाणीही प्रचंड गर्दी झाली.
या स्थितीत दर दिवसाला केवळ ५० वाहनांचे मोजमाप केले जात आहे. या ठिकाणी ६०० ते ८०० वाहनांची आवक आहे. शनिवारपासून वाहने खोळंबली आहेत.
यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ मोजमाप करण्याची मागणी केली. यावेळी अशोक भुतडा, किसन पवार, परसराम राठोड, अजाब चव्हाण, प्रशांत मरगडे, सलमान पठाण, विकास चव्हाण, गौतम नितनवरे, नीलेश पवार, जयदेव राठोड आदी उपस्थित होते.
सुटीच्या दिवशीही होणार मोजमाप
हा प्रश्न तातडीने सोडविण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी तहसीलदारांना दिल्या. तहसीलदार कुणाल झालटे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पणनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सुटीच्या दिवशी कापूस गाड्यांचे मोजमाप करण्याचे पणन व्यवस्थापनाने स्पष्ट केले.